Congress Criticizes Sunetra Pawar: काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणत टीका केली आहे. बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसने धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा? असा सवाल उपस्थित करत “सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील”, अशा शब्दात टीका केली. यावरुन राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेसची सुनेत्रा पवारांवर टीका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि धनंजय मुंडे यांचा बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडीओ काँग्रेसकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असता धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवार यांच्यासमोरच पत्रकारास रोखले. याचा व्हिडीओ काँग्रेसने पोस्ट करत धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, “सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील”, अशा शब्दात टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचे प्रत्युत्तर

यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. “सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणणे किती प्रस्तूत आहे हे येणारा काळचं ठरवेल. इंदिरा गांधी यांना देखील सुरुवातीला असेच म्हटले होते. पण, इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानचे युद्ध जिंकून दाखवले. राष्ट्रीयकृत बँकांची निर्मिती त्यांनी केली. अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील त्यांचे कौतुक केले होते”, असे पाटील काँग्रेसला प्रत्युत्तर देताना म्हणाले.

अंजली दमानियांनी केला निषेध

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेचा निषेध केला. काय ही भाषा? म्हणत दमानियांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. “गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का?”, असा प्रश्न देखील दमानियांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टॅग करत विचारला आहे. तसेच, “मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते”, अशी पोस्ट दमानियांनी काँग्रेसच्या व्हिडीओवर केली आहे.

सूरज चव्हाण यांच्याकडूनही टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस टुकार नेतृत्वाच्या हातात गेली आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या टीकेच्या निषेध केला. “काँग्रेसची सुसंस्कृत राजकीय विचाराची परंपरा राहिलेली आहे.आताची काँग्रेस विचार आणि जनतेपासून दूर गेलेली आहे.महिलेचा सन्मान नुसता भाषणातून नाही तर विचारातून दाखवावा लागतो.खालील पोस्ट वरून काँग्रेसची मानसिक स्थिती दिसून येते राज्यातील काँग्रेस टुकार नेतृत्वाच्या हातात गेली आहे”, अशी पोस्ट सूरज चव्हाण यांनी केलीय.