मुंबई : सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यू स्टारला इतिहासातील काळा दिवस संबोधणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे हे वक्तव्य अत्यंत बेजाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे असून सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे असून देशविरोधी भूमिका घेणाऱ्या महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.
महाजन यांनी देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीश महाजन यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती, तर भारताचे तुकडे करण्याचे कारस्थान रचणाऱ्या सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली अत्यंत कठीण आणि आवश्यक मोहीम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही देशाच्या एकता व अखंडतेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. या मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांच्या त्यागाचा अवमान करण्याचे काम गिरीष महाजन करत असल्याची टीका त्यांनी केली.
पंतप्रधानांना पत्र लिहून हकालपट्टीची मागणी करणार – संजय राऊत
देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीजरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल तर गिरीश महाजन यांना मंत्रीपदावरून तसेच भाजपमधून हाकलून द्यायला हवे. पंजाबला हिंदुस्थानात कायम ठेवण्यासाठी सैन्याने जी दहशतवादविरोधी कारवाई केली त्याला जर काळा दिवस म्हणत असतील तर महाजनांसारखे देशद्राेही तेच आहेत. त्यांनी इंदिरा गांधी यांचे बलिदान व्यर्थ ठरवले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महाजन यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याचे शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले.
पंजाबच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वक्तव्य – सचिन सावंत
गिरीश महाजन यांना ना इतिहास माहिती, ना यांचा कुठल्या विषयाचा अभ्यास आहे, परंतु भाजप सत्तेसाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो. याचे हे उदाहरण आहे. त्यांना अतिरेकी, खलिस्तानी, ऑपरेशन ब्ल्यू स्टार या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर पिस्तूल घेऊन भाषण करण्यासारख्या किंवा गाववाल्यांना पिस्तूल घेऊन बिबट्या शोधण्यासारख्या वाटत असल्याची टीका काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी केली. पंजाबच्या निवडणुका जवळ आल्याने त्यांना खलिस्तान जवळचे वाटू लागले काय, असा सवाल त्यांनी केला.
महाजन खलिस्तान समर्थक – शिशिर शिंदे
ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाईस काळा दिवस संबोधणे, विभाजनवादी शक्तींबरोबर व्यासपीठावर बसणे यावरून गिरीश महाजन हे खलिस्तानी समर्थक वाटतात. सुमारे ३०० महिलांचे अपहरण करून त्यांना सुवर्ण मंदिरात डांबून ठेवणारा भिद्रनवाले याचा महाजन यांना पुळका यावा हे सुद्धा आश्चर्यकारक आहे. अशा या महाजनांना घरचा रस्ता दाखविण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केली आहे.
