सांगली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची लोकसभेतील सदस्यता रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद सांगलीत उमटले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध करीत केंद्रातील सरकारविरुद्ध निदर्शने केली. हुकूमशाही पद्धतीने राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे खूप मोठे षडयंत्र आहे. या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत, अशा शब्दात सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस भवनसमोर सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता. हुकूमशाही पद्धतीने राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई केलेली आहे. या निर्णयाविरोधात देशातील जनता आपला रोष व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी विशाल पाटील म्हणाले, हा तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा डाव आहे. यातूनही ते ताऊन सुलाखून पुन्हा उभे राहतील. सारा देश त्यांच्या पाठीशी आहे. हेही वाचा - धक्कादायक! मुंबईत माथेफिरूचा शेजाऱ्यावर हल्ला, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी हेही वाचा - माहीमधील ‘त्या’ बांधकामावरील कारवाईनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “धर्मांध मुस्लिमांनी…” या आंदोलनात महिला प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, करीम मिस्त्री, नगरसेवक तोफिक शिकलगार, रवींद्र वळवडे, अभिजीत भोसले, संजय कांबळे, प्रकाश मुळके, मालन मोहिते, सनी धोतरे, महावीर पाटील, डी. डी. चौगुले, भाऊसाहेब पवार, धनराज सातपुते, अजित ढोले, आदिनाथ मगदूम, पी एल राजपूत, मौला वंटमोरे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.