सावरकर यांना माफीवीर म्हणत त्यांच्यावर राहुल गांधींनी टीका केली होती. २०२३ मध्ये केलेल्या भाषणात त्यांनी हे विधान केलं होतं. या नंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात खटला सुरु आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर हे हा खटला लढवत आहेत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सात्यकी सावरकर यांनी केली आहे. तसंच वीर सावरकर यांची सुटका कुठल्याही आवेदनांमुळे झाली नव्हती असंही म्हटलं आहे.

सात्यकी सावरकर यांनी काय म्हटलंय?

सध्या माझी उलट तपासणी चालली आहे. ५ मार्च २०२३ रोजी सावरकरांबाबत राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं त्यासंदर्भातला हा खटला आहे. मला उलट तपासणी दरम्यान त्यांचे वकील वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. सावरकारांनी ज्या याचिका पाठवल्या त्यासंदर्भात प्रश्न विचारत आहेत. मी त्यांना हे उत्तर दिलं की वीर सावरकरांची सुटका ही कुठलीही आवेदनं पाठवून झालेली नाही. वीर सावरकरांना १९३७ मध्ये बंधमुक्त करण्यात आलं. त्यावेळी बिगर काँग्रेस सरकार होतं. त्यांनी जो विधीमंडळात ठराव मंजूर केला त्यानुसार सावरकरांची सुटका १९३७ मध्ये झाली. इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याला म्हणतो जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते त्यांनीही १९२३ मध्ये काकिनाडा मध्ये जे अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष मोहम्मद अली जोहर होते. त्यावेळी सावरकारांच्या सुटकेबाबत ठराव संमत केला होता आणि तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता असं सात्यकी सावरकर यांनी सांगितलं. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.

गांधींजींनी सावरकरांच्या सुटकेसाठी लेख लिहिले होते-सात्यकी सावरकर

काँग्रेसला काही मान्य असो किंवा नको मात्र जो ठराव सावरकरांच्या सुटकेसाठी संमत झाला होता त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अभिलेखागारात जे पुरावे आहेत त्यात कुणी कुणी यात भाग घेतला होता त्याची नावंही नमूद आहेत. खटल्या संदर्भात आमची मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. कारण राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे बिनबुडाचं आहे. वीर सावरकरांनी लिहिलेल्या कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. गांधीजींनीही सावरकरांची सुटका होण्यासाठी लेख लिहिले होते. काँग्रेसने १९२३ ला ठराव संमत केला होता. असाच जर जोर भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या फाशीच्या वेळी लावला असता तर त्यांची फाशी टळली असती. असाच जोर जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी लावला असता तर ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते आणि स्वातंत्र्य लढ्याला कलाटणी मिळाली असती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकलं पण त्यावेळी त्यांच्या पाठिशी जर त्यावेळी काँग्रेस पक्ष उभा राहिला असता तर आपल्याला स्वातंत्र्य आधी मिळालं असतं असंही सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे.

आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे-सात्यकी सावरकर

जानेवारी २०२५ प्रक्रिया सुरु झाली होती त्यावेळी राहुल गांधींच्या विरोधात समन्स निघालं होतं आणि त्यांच्या वकिलांनी या संपूर्ण खटल्यातून त्यांना न येण्याचा अर्ज न्यायालयापुढे सादर केला होता. तो विनंती अर्ज कोर्टाने मान्य केला त्यामुळे राहुल गांधी कोर्टात येणार नाहीत, पण माझी उलट तपासणी लवकरात लवकर संपली पाहिजे. अन्य साक्षीदारांच्या साक्षीही पूर्ण झाल्या पाहिजेत. हा जो खटला आहे तो विशेष न्यायालयात आहे, हा खटला सहा महिन्यांत संपणं अपेक्षित असतं पण तसं घडलेलं नाही. हे कामकाज पूर्ण व्हावं आणि आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे असंही सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे.