बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडास २९ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या मस्साजोग येथे येथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि इतर कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर विरोधकांनी अजित पवार यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळत आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली, सर्वांची विचारपूस केली. संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण न्यायप्रविष्ट असून या गुन्ह्यातील सर्व दोषींना नक्कीच शिक्षा मिळणार, असा विश्वास धनंजय देशमुख यांच्याकडे व्यक्त केला,” अशी पोस्ट अजित पवारांनी एक्सवर केला आहे. या पोस्टवर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
हर्षवर्धन सपकाळ यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत अजित पवार यांना दोन दगडांवर पाय देऊन समाजात फूट पाण्याचे काम करू नये अशे म्हटले आहे. “एकीकडे अजित पवार हे मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत विचारपूस करतात, दोषींना शिक्षा मिळेल असा विश्वास व्यक्त करतात. त्याच बीड जिल्ह्यातील त्यांचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे गुन्हेगार वाल्मिक कराड यांच्या आठवणीत डोळ्यातनं अश्रू काढतात. अजित पवार, आपल्या पक्षाची एक काय ती भूमिका जाहीर करा, दोन्ही दगडांवर पाय ठेवत समाजात फुट पाडण्याचं काम करू नका.”
दरम्यान आज सकाळी आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे, ज्योती मेटे, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार विजयसिंह पंडित यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान माजलगाव येथे नगरपालिका प्रचारासाठी आलेल्या अजित पवार यांनी दखील दौऱ्यात नसताना मस्साजोग गाठले आणि धनंजय देशमुख यांची भेट घेतली.
धनंजय मुंडे काय म्हणाले होते?
परळी येथे प्रचार सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, “१२ महिने जगमित्र (कार्यालय) सुरू होतं. जे काय असेल, नसेल आपण गोरगरिबांना मदत करत होतो. पण आज ९ ते १० महिने झाले, कार्यालय सुरू आहे. काम देखील सुरू आहे. पण हे सर्व बोलत असताना आपल्याबरोबर आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव पण होत आहे. माझ्या सारख्या एका कार्यकर्त्याला आणि सहकाऱ्याला सहकारी म्हणून आजच्या कार्यक्रमात मला याची जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलंय, काय नाही ते न्यायालय पाहिलं. याची देखील जाणीव मला नक्कीच आहे.”
त्यांच्या या वक्तव्याचा नेमकं अर्थ काय? याबाबत उलटसूलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच धनंजय मुंडे यांनी भर सभेत वाल्मिक कराडची अप्रत्यक्ष आठवण काढल्याची चर्चा झाली आणि विरोधकांनी यावर टीका देखील केली.
