काँग्रेसच्या पर्यटन महोत्सवाला मैदान मिळण्यासाठी उपोषण

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या पर्यटन महोत्सवासाठी १७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत मैदानाची मागणी केली होती,

सुंदरवाडी पर्यटन महोत्सवासाठी सावंतवाडी तालुका काँग्रेसने जिमखाना मैदानाची मागणी करूनही नगर परिषद मैदान उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत असल्याने काँग्रेसने उपोषण केले. काँग्रेसच्या पर्यटन महोत्सवाची काळजात धडकी भरल्याने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मैदान राखीव ठेवण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केला, तर दुपारी तहसीलदार सतीश कदम यांनी सुंदरवाडी पर्यटन महोत्सव नियोजित वेळीच करण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन समाप्त करण्यात आले.
सुंदरवाडी पर्यटन महोत्सवाची घोषणा माजी खासदार नीलेश राणे यांनी केल्यानंतर महोत्सवाला जागाच उपलब्ध करून द्यायची नाही, अशा भावनेने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी षड्यंत्र करून नगरपालिकेवर मैदान न देण्यास दबाव आणला आहे. पालकमंत्र्यांच्या षड्यंत्रामुळेच काँग्रेसला मैदान देण्यात टाळाटाळ करण्यात आल्याची भावना तालुका अध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या पर्यटन महोत्सवासाठी १७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत मैदानाची मागणी केली होती, परंतु शासनाचा कोकण सरस हा कार्यक्रमदेखील १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मैदानावर होणार असल्याने नगर परिषदेने मैदान नाकारले होते. त्यानंतर काँग्रेसने उपोषणाचा इशारा दिला. त्याप्रमाणे आज सकाळी १० वाजल्यापासून काँग्रेसचे पदाधिकारी उपोषणास बसले. त्यानंतर तहसीलदार सतीश कदम यांच्या आश्वासनाअंती दुपारी ३ वाजता उपोषण मागे घेण्यात आले.
सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणास काही वेळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत उपोषणास बसले. त्यानंतर व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, डी. के. सावंत, बाळ बोर्डेकर, पुंडलिक दळवी, भाजप शहर अध्यक्ष आनंद नेवगी, अन्नपूर्णा कोरगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, नगरसेवक गोविंद वाडकर व इतरांनी भेट दिली.
काँग्रेसच्या या उपोषणास सभापती प्रमोद सावंत, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, बाळा गावडे, दिलीप भालेकर, संदीप कुडतरकर, संतोष गावस, राजू मसूरकर, नितीन कुडतरकर, मंदार नार्वेकर, अन्वर खान, प्रमोद गावडे, गुरुनाथ पेडणेकर, माया चिटणीस, विशाल परब, गुरू सावंत, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, केतन आजगावकर, जयंती सावंत, स्नेहा सावंत, सुनीता पेडणेकर, ज्योती पाटणकर, मधुमती गावडे, राजू परब, उत्कर्षां सासोलकर, संदेश पटेल, संतोष जोईल, साधी वंजारी, वैष्णवी ठोंबरे, शीला सावंत, गीता परब, सुमीत वाडकर, प्रकाश कवठणकर, एकनाथ नाडकर्णी, सत्यवान बांदेकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपोषणास बसले होते.
सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या उपोषणस्थळी घोषणा देणारे पालक झळकत होते. सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनलेल्या शिवसेनेचे मुख्याधिकारी द्वासे यांचा निषेध, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हट्टीपणामुळे मैदान नाकारले, सुंदरवाडी महोत्सवासाठी मैदान नाकारणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेचा निषेध असो, पालिकेचे उत्पन्न बुडविणाऱ्या नगरपालिका प्रशासनाची चौकशी करा, कशात काय-फाटक्यात पाय मच्छीमार्केटचे झाले काय?, विनामोबदला इतर गोष्टीसाठी मैदान देणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेची कलम ३०८ खाली चौकशी करा, अशा घोषणा व फलकांनी उपोषणस्थळी वातावरण होते.
सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी नगराध्यक्ष साळगांवकर म्हणाले, महोत्सवासाठी मैदान देण्यास तयार आहोत, पण शासनाचा पूर्वनियोजित कोकण सरस कार्यक्रम निश्चित झाला आहे. आपल्या महोत्सवाच्या तारखांत बदल करा असे सुचविले. लोकांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, असे बबन साळगांवकर म्हणाले.
यानंतर व्यापारी संघाचे पदाधिकारी जगदीश मांजरेकर, बाळ बोर्डेकर, डी. के. सावंत, किरण सिद्धये, राजेश पनवेलकर, आनंद नेवगी, पुंडलिक दळवी व इतरांनी भेट दिली. नगरसेवक गोविंद वाडकरदेखील भेटले.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. ते म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी षड्यंत्र रचून काँग्रेस महोत्सव होणार नाही याची काळजी घेतली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते संतापून कायदा हातात घेतील आणि त्याचे भांडवल दहशतवाद म्हणून करण्याचा हेतू केसरकर यांचा आहे. त्यांचे षड्यंत्र हे थंड दहशतवादाचा भाग आहे. त्यांच्या थंड दहशतवादाची लक्तरे जनताच वेशीवर टांगेल असे सावंत म्हणाले.
सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम यांनी उपोषणस्थळी भेट दिली. तेव्हा पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, नगरपालिका अधीक्षक सौ. शिरोडकर, अभियंता तानाजी पालव उपस्थित होते. यावेळी संजू परब, डॉ. जयेंद्र परुळेकर, बाळा गावडे यांनी नगरपालिकेच्या अनेक तक्रारी करून निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देतो ते योग्य ती चौकशी करतील, असा विश्वास तहसीलदार कदम यांनी व्यक्त केला. सुंदरवाडी महोत्सव ठरल्यावेळी करण्यासाठी प्रशासन मदत करेल, त्यासाठी मैदान शोधू या असे आश्वासन देत उपोषण समाप्त केले.
नगराध्यक्ष बबन साळगांवकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुटवळ यांना भेटले, त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकरदेखील उपस्थित होते. शासनाचा कार्यक्रम रद्द करता येणार नाही असे प्रशासनाने सांगितले असेही साळगांवकर म्हणाले. दरम्यान खासदार विनायक राऊत यांनीदेखील मंत्रालयीन पातळीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी चर्चा केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress hunger strike to get a field for tourism festival