सेवाग्राममधील शिबिरात राहुल गांधी यांची टीका

वर्धा : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाच्या विचारांतून समाजात द्वेष पसरवत आहेत. काँग्रेसचा विचार नेहमीच समाजाला जोडण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न भाजप-संघ करीत आहे. त्यांची प्रतीके वेगळी आहेत. त्यांचे आदर्श सावरकर, तर काँग्रेसचे महात्मा गांधी आहेत, असे नमूद करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून सुरू झालेल्या हिंदुत्वाच्या राजकारणात पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

वर्ध्यामध्ये सेवाग्राम आश्रमात शुक्रवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिरातील कार्यकर्त्यांशी दूरचित्र संवाद माध्यमातून राहुल गांधी यांनी संवाद साधला. हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे असून भाजप फक्त हिंदुत्वावर बोलतो. समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या या विचारांचा काँग्रेसने विरोध केला आहे. सध्या काँग्रेसचा विचार निष्प्रभ करण्याचा प्रयत्न भाजप-संघ करत आहे. २०१४ नंतर म्हणजे मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर राजकीय विचारांची लढाई महत्त्वाची बनली आहे. भाजप-संघाकडे हिंदुत्वाच्या प्रचारासाठी प्रभावी प्रचारयंत्रणा आहे. काँग्रेसच्या विचारांच्या प्रसारासाठी पक्षाकडे यापैकी काहीही नाही. त्यामुळे पक्षात वैचारिक भूमिका भक्कम होण्यासाठी आणि भाजपविरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण सक्तीचे असले पाहिजे, असे राहुल म्हणाले. भगवान शंकराकडे अवघ्या विश्वाला कवेत घेण्याची ताकद आहे, तशीच काँग्रेसकडेही भाजपची विचारसरणी पचवण्याची ताकद आहे. काँग्रेसचे विचार म्हणजे दागिन्यासारखे आहेत. हा विचारांचा दागिना कार्यकर्त्यांकडे असेल तर, भाजपचे विचार कधी लुप्त होतील, हे भाजपलाही कळणार नाही, असे राहुल यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल यांचे हे भाषण म्हणजे सलमान खुर्शीद यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन असल्याचा आरोप भाजपने केला आहे. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना ‘आयसिस’ आणि ‘बोको-हराम’ या दहशतवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केली आहे. काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनीही शुक्रवारी भाजपच्या हिंदुत्वावर प्रखर टीका केली. रामाचा जप करणारे राक्षस असून आता परमेश्वराने कल्कीचा अवतार धारण करून पापी लोकांचा नाश करावा, अशी प्रार्थना करतो, असे म्हणत अल्वी यांनी भाजपवर प्रहार केला आहे. त्यावर, ‘गेल्या २४ तासांमध्ये हिंदू धर्मावर खुर्शीद, अल्वी आणि खुद्द राहुल गांधी अशा तिघांनीही टीका केली आहे. गांधी घराणे हिंदूविरोधी असून राहुल यांनी फूस दिल्यामुळेच काँग्रेसचे नेते हिंदू धर्माविरोधात बोलतात,’ असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

कबीर, गुरुनानक, महात्मा गांधी…

कबीर, गुरुनानक, महात्मा गांधी अशा सर्व थोर पुरुषांनी समाजाला जोडणाऱ्या विचारांचा प्रसार केला. हाच विचार काँग्रेस मानते. पूर्वी काँग्रेस पक्ष आपली राजकीय विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट घेत होता, आता हे काम थांबले आहे; पण आता पक्ष संघटनेमध्ये काँग्रेसविचारांचा प्रसार केला पाहिजे, वैचारिक भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात हा विचार पोहोचवला पाहिजे, अशी सूचना राहुल यांनी कार्यकर्त्यांना केली. त्यावर युक्तिवाद करताना भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की, कबीर, गुरुनानक यांची नावे राहुल यांनी घेऊ  नयेत. काँग्रेस हिंदू धर्मविरोधी असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. ‘विकिलीक्सस’चे गौप्यस्फोट झाले तेव्हा २०१७ मध्ये राहुल म्हणाले होते की, भारतात दहशतवाद्यांपेक्षा जास्त धोका देशातील हिंदूंकडून आहे. ‘इन्कलाब’ वृत्तपत्राने राहुल गांधी यांचे, काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचे विधान प्रसिद्ध केले होते. हिंदू-पाकिस्तान, हिंदू-तालिबान, भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग केले गेले आहेत. राहुल मतांचे राजकारण करतात, असा प्रतिवाद पात्रा यांनी केला.

शिवसेना ऐकून कशी घेते : भाजप

नवी दिल्ली : राहुल गांधी हे सावरकर विरुद्ध गांधी असा वाद सातत्याने उकरून काढत आहेत. महान व्यक्तींना विभक्त करू नका. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. सावरकरांसारख्या व्यक्ती देशाचा गौरव आहेत. मराठी माणसांनी आपल्या शौर्यामुळे अवघ्या हिंदुस्थानात मान मिळवला. सावरकरांसारख्या मराठी व्यक्तीवर दररोज शाब्दिक हल्ला केला जातो, हे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना सहन कसे करते, असा सवाल पात्रा यांनी केला.