|| प्रल्हाद बोरसे

मालेगाव : राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमधील सुंदोपसुंदी वेळोवेळी उघड होत असताना स्थानिक पातळीवरही या पक्षांमध्ये आलबेल असल्याचे चित्र नाही. राष्ट्रवादी पक्षाने आगामी काळात तालुका पातळीवर होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देण्यात झाला आहे.

मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार असण्याचा स्थानिक पातळीवर पक्षाला कुठलाच फायदा होतांना दिसत नाही. उलटपक्षी कामे होत नसल्याने सर्वसामान्य जनतेत नाराजीचा सूर उमटत असून त्यामुळे पक्षाची कोंडी होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मालेगावमधील नेते दादा भुसे हे कृषिमंत्री आहेत. ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा सूर बैठकीत लावण्यात आला. तेव्हा आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये सेनेशी आघाडी करणे हे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होईल, अशी भीती बैठकीत व्यक्त केली गेली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघातून पराभव झाला असला तरी काँग्रेस उमेदवाराला ७३ हजार मते पडली होती. याकडे अंगुलिनिर्देश करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राबल्यामुळेच एवढी मते पडल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. स्वबळावर निवडणुका लढविल्यास कार्यकर्त्यांना संधी प्राप्त होऊन त्यायोगे पक्ष संघटन मजबुत होईल आणि पर्यायाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा पक्षाला लाभ होईल, असे गणित यावेळी मांडण्यात आले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मांजरपाडा – २ या पाणी प्रकल्पासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांची पक्षाच्या माध्यमातून तड लावावी आणि त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तालुक्याला खास वेळ द्यावा, असा आग्रहदेखील धरण्यात आला.

कृषिमंत्री दादा भुसे हे सलग चार वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले असून प्रत्येक वेळी त्यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे बघावयास मिळाले. शहराच्या पश्चिाम भागात तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात आजच्या घडीला सेनेची पक्ष संघटना अत्यंत मजबुत स्थितीत आहे. राज्यात भाजपबरोबर युती असतानाही स्थानिक पातळीवरील महापालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भुसे यांनी मागील १५ वर्षात भाजपबरोबर सेनेची युती करणे कटाक्षाने टाळल्याचा इतिहास आहे.  या सर्व पाश्र्वाभूमीवर शिवसेना अन्य कुठल्या पक्षांशी युती करण्याची शक्यता फारच धूसर दिसत आहे.

गेल्या आठवड्यात भुसे यांनी विकासाच्या मुद्यावर येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पक्षभेद बाजूला ठेवत सर्वांच्या भावना लक्षात घेऊन विकासाचा आराखडा बनविण्याचे त्यांनी या बैठकीत घोषित केले होते.

मालेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सापत्नपणाची वागणूक मिळत असून जनतेची कामे होत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग मालेगाव तालुक्यात आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविले गेले तर राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच चांगले भवितव्य आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचीदेखील पक्षाची क्षमता आहे. – डॉ. जयंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते व मविप्र संचालक