भाजप सरकार दलित समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत आहे,आणि संविधान बदलण्याचे काम करते आहे हा अपप्रचार काँग्रेसकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे. दलित समाजात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणे हाच यामागचा काँग्रेसचा उद्देश आहे अशी टीका सामाजिक आणि न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.

एवढेच नाही तर राज्यातले आणि केंद्रातले सरकार अत्यंत उत्तम काम करते आहे. देशातल्या प्रत्येक घटकासोबत हे सरकार आहे अशी ग्वाहीही रामदास आठवले यांनी दिली. विरोधकांकडे आपल्या सरकारविरोधात बोलण्यासाठी काहीही मुद्देच उरले नाहीयेत त्यामुळे अशी काही वक्तव्ये करून भाजप सरकारची बदनामी केली जाते आहे.

दलित बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून होते आहे असाही आरोप आठवले यांनी केला. दलित समाजावर होणारा अन्याय हा जातीयवादामुळे होतो आहे. यावर उपाय योजण्याची गरज आहे. तसेच दलित समाजाबाबत काही घटकांमध्ये कटुता बघायला मिळते ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून देशाच्या कुरापती काढल्या जातात त्यावर सर्जिकल स्ट्राईक करून सरकारने उत्तर दिले आहे. तरीही पाकिस्तानची खुमखुमी कायम आहे. त्यांना आता केंद्र सरकारने धडा शिकवला पाहिजे अशीही भूमिका आठवलेंनी मांडली आहे.