चिपळूण :  देशात सर्वधर्मसमभावाची भूमिका कायम ठेवणाऱ्या कॉंग्रेसने सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन राजकारण केले आहे. मात्र गेल्या बारा वर्षांत भाजपाने हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून समाजात फूट पाडण्याचे राजकारण सुरू केले आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेची रविवारी सांगता झाली. चिपळूण येथे आयोजित शिबिराच्या समारोपप्रसंगी ऑनलाईन संबोधित करताना चेन्नीथला म्हणाले, निवडणुकांत जय-पराजय होत असतात; पराभवाने खचून न जाता संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा. तालुका, जिल्हा, ब्लॉक, वॉर्ड आणि बूथ पातळीवर पक्षबांधणी बळकट करा. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून  खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते  राहूल गांधी यांचे हात बळकट करा. ‘काँग्रेसचा शिपाई’ म्हणून काम केल्यास पक्षाला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या शिबिरास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, माजी खासदार हुसेन द्लवाई, आमदार भाई जगताप यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कोकणात संघटना बळकट करणार’

शिबिरानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, चिपळूणमधील कार्यशाळेतून नेतृत्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आघाडीचे राजकारण ही अपरिहार्यता असली तरी कोकणात त्याचा पक्षाला फटका बसला. आगामी काळात कोकणात संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल. तळागाळातील कार्यकर्त्यांना या शिबिरातून ऊर्जा व प्रोत्साहन मिळेल, असा दावा त्यांनी केला.

संभाजी महाराज स्मारकावरून सरकारवर टीका

संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. स्मारक उभारणीच्या घोषणा वारंवार करूनही अंमलबजावणी झालेली नाही, हे महायुती सरकारच्या निष्क्रियतेचे लक्षण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्मारकाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.