शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यात काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. या तर्कवितर्कं चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता स्वत: अशोक चव्हाण यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “माध्यमांद्वारे सुरु असलेले वृत्त चुकीचे आणि विपर्यास आहे. राज्यात गणेशोत्सव काळात पक्षीय मतभेद विसरुन नेतेमंडळी एकमेकांकडे जात असतात. पक्षाच्या पलिकडे सर्वांचे संबंध असतात. माझी त्यांच्यासोबत थोडीच दुश्मनी आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असे चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

“राहुल गांधी यांच्या भारत जोडो…”

“काँग्रेस पक्षाचं महागाईविरोधात आंदोलन आहे. त्यासाठी मी दिल्लीला जात आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत माझी बैठकही आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं महाराष्ट्रातील नियोजन माझ्याकडे आहे. त्याचे देखील नियोजन येत्या काही दिवसांत करायचं आहे,” असेही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“माझी भेट झाली नाही”

या भेटीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढ्यात मी पोहचलो. असं तर सगळ्यांचं होतं. मात्र, माझी आणि त्यांची कुठलीही भेट झालेली नाही.”

“…तर त्यांना सोबत घेऊ”

“भाजपाला दुसरा पक्ष फोडण्यात रस नाही. कोणाचा पक्षही भाजप फोडत नाही. मात्र, कोणाच्या पक्षात फूट पडत असेल आणि ते आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आम्हाला गरज पडेल उपयोग होईल, तेव्हा जेवढे काही असंतुष्ट गट असतील, त्यांचा भाजपासाठी उपयोग करुन घेऊ. आता आम्हाला कोणाचाही गरज नाही आहे. आमच्या विचारांशी असंतुष्ट सहमत असतील, तर त्यांना सोबत घेऊ,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर दिली आहे.

“प्रस्ताव आला तर विचार करु”

मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनीही अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर वक्तव्य केलं आहे. “अशोक चव्हाण यांचा प्रस्ताव आला तर विचार करु. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. भाजपा पक्ष श्रेष्ठीच त्यासंदर्भातील निर्णय घेतील. काँग्रेस पक्षाला काय भविष्य राहिलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते आता आपला विचार करत आहेत. अशोक चव्हाण आणि माझी याबाबत चर्चा झाली नाही,” असे विखे पाटील म्हणाले आहे.

“वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारं”

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारं आहे. अशोक चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबात जबाबदारीने वृत्तांकन करण अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांनी हे थांबवावं,” असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे.