scorecardresearch

“सरकारी कार्यक्रमात भाजपाचे नेते कसे सहभागी होतात?” ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमावरून काँग्रेसची टीका; म्हणाले, “शाळकरी मुलांमध्ये…”

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे.

congress criticied bjp on parisha pe charcha program
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असल्याचा गंभीर असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”

काय म्हणाले अतुल लोंढे?

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम देशभरातील शाळांमध्ये दाखवण्याचे निर्देश देण्यात केंद्र सरकारतर्फे देण्यात आले होते. ग्रामीण भागात वीज व इंटरनेट सुविधेचा अभाव असतानाही मुख्याध्यापकांना हा कार्यक्रम मुलांना दाखवण्याचे फर्मान सरकारकडून काढण्यात असून पंतप्रधानांचा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यासाठी अनेक शाळांना वेठीस धरण्यात आलं, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला. तसेच हा सरकारी कार्यक्रम असतानाही भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांबरोबर सहभागी होण्याची काय गरज होती? शाळकरी मुलांमध्ये राजकीय नेत्यांची ही लूडबुड काय कामाची? पंतप्रधानांचे धडे ऐकण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, की भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी? असे प्रश्नही उपस्थित केले.

हेही वाचा – “जयंत पाटील पहाटेच्या शपथविधीबाबत जे बोलले ते खरं असेल तर शरद पवारांनी…” चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक

सरकारी कार्यक्रमात भाजपाचे नेते कसे?

भारतीय जनता पक्ष राजकारणासाठी व सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आता त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शाळकरी मुले व शाळांचा वापर सुरु केला आहे. विद्यार्थी दशेतील या मुलांना ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपाचे राजकीय धडे गिरवायला लावणे, हे या मुलांवर अन्याय करणारे आहे. अशा सरकारी कार्यक्रमात भाजपाचे नेते व पक्ष पदाधिकाऱ्यांनी शाळेत विद्यार्थ्यांसह सहभाग घेऊन भाजपाचा प्रचार व प्रसार करतात, असा आरोपही त्यांनी केला. तसे भाजपाच्या नेत्यांनी मुलांच्या भवितव्याचा तरी विचार करायला हवा, असेही लोंढे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:52 IST
ताज्या बातम्या