संगमनेर: देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांना भारतीय नागरिकाच्या जीवनामध्ये आदराचे स्थान आहे. संगमनेरमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे सुंदर स्मारक व्हावे, यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ४२ गुंठे जागा दिली जाणार असल्याची घोषणा काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने कारगिल दिनाच्या निमित्ताने वीरमाता, वीरपत्नी व समाजभूषण पुरस्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रा. बाबा खरात, किसनभाऊ हासे, युवराज गांजवे, रोहिणी कोटकर यांच्यासह स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी माजीमंत्री थोरात म्हणाले की, कारगिलचा विजय हा इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. पाकिस्तानच्या कुरापतीविरुद्ध सैनिकांनी अत्यंत कठीण परिस्थितीत लढून हा विजय मिळवला. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. भारतीय सैनिक सीमा भागामध्ये ऊन, वारा, पाऊस, थंडीमध्ये रात्रंदिवस पहारा करतात, म्हणून देशाचे नागरिक शांत झोपू शकतात. देशाच्या रक्षणाकरता अनेक सैनिकांनी त्याग, बलिदान केला आहे. या सर्वांप्रती देशवासीयांना सदैव कृतज्ञता आणि अभिमान आहे.

पहिले महायुद्ध व दुसऱ्या महायुद्धातही भारतीय सैनिकांनी मोठे शौर्य दाखवले. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान व चीनशी झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने विजय मिळवला. व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचे स्मारक संगमनेरमध्ये व्हावे याकरता स्वराज्य सैनिक समितीचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याची वेल्हाळे परिसरातील ४२ गुंठे जागा या स्मारक समितीला दिली जाणार असून या ठिकाणी राज्यातील सुंदर असे स्मारक व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक प्रकाश कोटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र जोशी तर सुनील थोरात यांनी आभार मानले. कारगिल विजय दिवसनिमित्ताने विद्यार्थ्यांनी रॅली काढली. यावेळी वंदे मातरम, जय जवान जय किसान, या घोषणांनी परिसर दुमदुमला.

पुरस्कारार्थी

डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले यांचा समाजभूषण पुरस्काराने, वीरपत्नी वैशाली बडे, वीरपत्नी वर्षा घोडेकर, वीरपत्नी सुरेखा पवार, वीरपत्नी मनीषा गुंजाळ, वीरपत्नी मंगल वलटे, वीरपत्नी सिंधुताई मनसुख, आणि वीरमाता लहानुबाई ढगे यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरविण्यात आले.