Balasaheb Thorat : राज्यात विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या सभा, मेळावे आणि आढावा बैठका सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरै सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने अनेकदा केली आहे. मात्र, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील नेत्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आणि काँग्रेसला आवाहन करत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठींबा देतो, असं म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर आता काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं आहे. “महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हा निहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले, “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगलं काम करण्याचं आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे अनेकदा बोलून दाखवले होते. एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांनी सांगावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोणीही नसल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. दरम्यान, यानंतर आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असं विधान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.