काँग्रेसने एका कुटुंबाला किती द्यायचे. विखे-पाटील यांनी मागितले आणि पक्षाने दिले नाही, असे कधीच झाले नाही. राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पत्नीला पक्षाने पद दिले. आता मुलगा पण हट्ट करतोय. पक्षाने इतके दिले असतानाही वेळोवेळी त्यांच्या भूमिकेत बदल दिसून आला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेससोबतची भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत भाजपात जाण्याचा सुजय यांचा निर्णय त्यांना फायदेशीर ठरणार नसल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.

‘एबीपी माझा’शी थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सुजय विखे पाटील हे वैयक्तिक निर्णय असल्याचे कितीही म्हणत असतील तरी मला तसे वाटत नाही. विखे-पाटील यांची कार्यपद्धती आम्हाला, जनतेला, पक्षालाही माहीत आहे. ते काँग्रेसमध्ये जे करत होते. तेच आता भाजपात करतील, असा टोला लगावत काँग्रेसवर याचा काहीच परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचे भवितव्य चांगले आहे. चढ-उतार हे होतच असतात. एका कुटुंबाला पक्षाने किती द्यावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न नगर जिल्ह्यापुरता नव्हे तर राज्य पातळीवरचा आहे. ते विरोधी पक्षनेते आहेत. ते आमचे नेते आहेत. त्यांनी बैठक बोलावली पाहिजे. निवड समितीत ते आहेत. त्यांनी आपली भूमिका ठरवायला हवी. आपण राज्याचे नेतृत्व करू शकतो हे त्यांनी सिद्ध केले पाहिजे. त्यांनी जनतेसमोर येऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. अविश्वासाचे वातावरण दूर करण्याची त्यांची जबाबदार आहे, असेही थोरात म्हणाले.

विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात आणि एका पक्षात असूनही थोरात-विखे पाटील यांचे कधी जमले नाही. यांच्यातील राजकीय वैमनस्य संपूर्ण राज्याला माहीत आहे. एकाच पक्षात असूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याची ते कधीच संधी सोडत नाहीत.