“…मग आता अध्यक्षांची निवडणूक कोणत्या कायद्यानुसार?” बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांना खोचक सवाल

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे.

balasaheb thorat bhagatsingh koshyari
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (प्रातिनिधीक फोटो)

मागील काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रलंबित आहे. संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याचं कारण सांगून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास नकार दिला होता. महाविकास आघाडी सरकारच्या शिस्तमंडळाने राज्यपालांना भेटून अनेकदा विनंती केली होती. पण राज्यपालांनी निवडणूक घेण्यास परवानगी दिली नव्हती. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत राज्यपालांना खोचक सवाल विचारला आहे. संबंधित व्हिडीओत त्यांनी म्हटलं की, “महाविकास आघाडीचं शिस्तमंडळ राज्यपालांना अनेकदा भेटलं. विधानसभेचा अध्यक्ष निवडू द्यावा, यासाठी तीन-तीन वेळा आग्रह केला. कारण विधानसभेचा अध्यक्ष तातडीने निवडला गेला पाहिजे, असं घटनेनं देखील सांगितलं आहे. पण राज्यपालांचं उत्तर असं आलं की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. त्यामुळे मी अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊ शकत नाही.”

हेही वाचा- शिंदे सरकार राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवीन यादी पाठवणार

“आता मात्र राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आम्ही कायद्यात जो नवीन बदल केला होता. तो आता वैध ठरला का? की जुन्याच पद्धतीने निवड करणार?” अशा शंका बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केल्या आहेत.

त्यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या पत्राची आठवण करून देताना सांगितलं की, “संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याचं कारण देत विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ शकत नाही, याचं पत्र त्यांनी दिलं होतं. त्यामुळे आता निवडणूक कशी होणार आहे? याचंही उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. “या सर्व बदलांमध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीची थट्टा झाली, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader balasaheb thorat statement on assembly president election and governor bhagat sigh koshyari rmm

Next Story
साताऱ्याच्या सर्व लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदेंचा अभिमानच!
फोटो गॅलरी