सांगोल्याजवळ भरधाव मोटारीचा ताबा सुटल्याने घडलेल्या अपघातात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस, दलित मित्र काशिनाथ सैदू काटे (६८) व त्यांचे सहकारी रामलिंग महादेव पाटणे (६२) या दोघांचा मृत्यू झाला. मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार पलटी होऊन ही दुर्घटना घडली.
काशिनाथ काटे (रा. यलमार मंगेवाडी, ता. सांगोला) व रामलिंग पाटणे (रा. सांगोला) हे दोघे रात्री सांगोला येथून जवळच्या वाढेगाव येथे ढाब्यावर भोजनासाठी गेले होते. भोजन आटोपून सांगोल्याकडे परत येत असताना वाटेत धोकादायक वळणावर मोटारीवरील चालकाचा ताबा गेला आणि काही क्षणातच मोटार पलटी झाली. यात मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. काटे व पाटणे हे दोघेही बाहेर फेकले गेले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सांगोला पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. दरम्यान, शेकापचे नेते, आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह देशमुख, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार शहाजीबापू पाटील आदींनी काटे व पाटणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मालट्रकला आग
मुंबईहून लाकडी फर्निचर घेऊन सोलापुरात आलेल्या मालमोटारीला उंच विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत मालमोटारीतील फर्निचर जळाले. मालमोटारीचेही नुकसान झाले. रविवारी दुपारी पाऊणच्या सुमारास भवानी पेठेत ही दुर्घटना घडली. एमएच १४ सीपी २१९८ ही मालमोटार शहरात दाखल झाल्यानंतर शहरात जडवाहतुकीला बंदी असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी सदर मालमोटार अडविली. तेव्हा पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मालमोटारचालकाने जुन्या तुळजापूर नाक्याजवळ लगतच्या वळणावरील रस्त्यावर मालमोटार नेण्याचा प्रयत्न केला असता उंच विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. जोडभावी पोलिसांनी मालमोटारचालकाला ताब्यात घेतले आहे.