scorecardresearch

कृषी खात्याच्या कारभाराविरोधात काँग्रेस नेत्याची ‘ईडी’कडे तक्रार

गुणनियंत्रण विभागाच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्याने थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार केली आहे.

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील सर्वाधिक मलईदार विभाग समजल्या जाणाऱ्या गुणनियंत्रण विभागाच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्याने थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष असलेले वसंत संपतराव मुंडे यांनी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण संचालकांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली आहे. २०१९पासून मुंडे कृषी आयुक्त, मुख्यमंत्री, विरोधा पक्षनेते, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे विभागाकडे चौकशीसाठी अर्ज, विनंती, निवेदने देत आहेत. मात्र, त्याची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे आता थेट ईडीकडे तक्रार केली आहे. या बाबत बोलताना मुंडे म्हणाले, ‘‘गुणनियंत्रण विभागातील पदांसाठी मंत्रालयातून मोर्चेबांधणी केली जाते.  मोठी रक्कम देऊनच अधिकारी गुणनियंत्रण विभागातील पदावर येतात.  पदभार हाती घेताच वसुली सुरू करतात. त्याचा परिणाम म्हणून निकृष्ट बियाणे, औषधे, खतांच्या विक्रीला मान्यता देतात. या मुळे दर वर्षी बियाणे न उगविणे, औषधांची फवारणी केल्यानंतर रोपे, द्राक्षवेली वाळून जाण्याचे प्रकार घडतात. सोयाबीन बियाणांच्या बाबत दर वर्षी बोगस बियाणांचा प्रश्न ऐरणीवर येतो. पण, राज्यातील कोणतीही यंत्रणा या विरोधात काम करू शकत नाही असा आरोप मुंडे यांनी केला आहे.

दर वर्षी राज्यात शेतकऱ्यांकडील घरचे बियाणे वगळता १५ लाख टन सोयाबीन बियाणांची आवश्यकता असते. प्रत्यक्षात महाबीज फक्त ५-६ लाख टन बियाणे देते. बाकीचे बियाणे खासगी कंपन्या देतात. काही कंपन्यांचे अपवाद वगळता हे बियाणे अनेकदा निकृष्ट असते. आजवर राज्याच्या अनेक यंत्रणांकडे तक्रारी केल्या पण, दखल घेतली नाही म्हणून आता ईडीकडे तक्रार केली आहे.

– वसंत मुंडे, तक्रारदार, परळी, जि. बीड

वसंत मुंडे यांनी ‘ईडी’कडे केलेल्या तक्रारीची अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. विभागाचा कारभार पारदर्शी आहे, आमच्यावरील आरोप मोघम आहेत. खरीप हंगाम २०२०मध्ये सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत तक्रारी होत्या. ८३ तक्रारी दाखल केल्या आहेत. सुमारे एक हजार प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत. त्याबाबत २८ बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची बियाणे आणि रोख स्वरूपात मदत केली आहे.

-दिलीप झेंडे, संचालक कृषी विभाग (निविष्ठा व गुणनियंत्रक)

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader lodges complaint with ed against agriculture department zws

ताज्या बातम्या