राज्य शासनाने ऐतिहासिक आर. के. स्टुडिओ विकत घेऊन त्या जागेवर हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय उभारावे अशी मागणी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. अभिनेते राज कपूर यांनी ७० वर्षांपूर्वी बनवलेल्या आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट केले आहे.

‘आर. के. स्टुडिओसंदर्भात राज्य व देशातील सांस्कृतिक क्षेत्रामधील जनतेच्या भावना जुळलेल्या असल्याने ही वास्तू कायम राहावी या दृष्टीने राज्य शासनाने हा स्टुडिओ विकत घ्यावा. त्या जागेवर हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय उभारावे जेणेकरून मुंबईसारख्या ठिकाणी एक चांगले पर्यटनस्थळ पर्यटकांना उपलब्ध होईल व कला साहित्याचे जतनदेखील होईल,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

स्टुडिओच्या देखभालीचा खर्च हा अधिक असून यातून मिळणारे उत्पन्न मात्र कमी असल्यामुळे हा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतल्याचे कळत आहे. कपूर कुटुंबियांनी स्टुडिओच्या विक्रीबाबत बिल्डर, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्ससोबत बोलणीदेखील सुरू केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आर. के. स्टुडिओला भीषण आग लागली होती. या भीषण आगीत स्टुडिओचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे स्टुडिओ पुन्हा उभा करणे मोठे खर्चिक आणि अशक्य असल्याने तो विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला असल्याचे समोर येत आहे.