भाजपाला आगामी काळात भगदाड पडणार आहे असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपाचं राजकारण हे जातींमध्ये तेढ निर्माण करणारं आहे असाही आरोप केला आहे. तसंच लवकरच दुसऱ्यांची घरं फोडणारी भाजपा फुटणार असून भाजपाला मोठं भगदाड पडणार आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत नाना पटोले?
सगळ्याच समाज बांधवांना माझी एक विनंती आहे की भाजपाने सामाजिक तेढ निर्माण करण्याचं जे बीज रोवलं होतं त्यात ते यशस्वी झाले. ते कुणालाही काहीही देऊ शकत नाहीत ते फक्त वाद निर्माण करतात. त्यांच्या आश्वासनांना भुलू नका. संवैधानिक व्यवस्थेत ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय क्लिअर आहेत. भाजपा सत्तेसाठी काहीही करु शकते. धर्मांमध्ये, जातींमध्ये भांडण लावू शकते. हे त्यातलंच एक चित्र आहे. २०१४ पासून हेच सुरु आहे. जे बीज लावलं त्याचे काटेरी वृक्ष झाले आहेत. समाज बांधवांमध्ये द्वेष वाढतो आहे, याचं कारण भाजपा आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु असतानाच आदिवासी बांधवांनीही आंदोलन सुरु केलं आहे. याबाबत विचारलं असता नाना पटोले यांनी हे उत्तर दिलं आहे.




पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची एक नम्र विनंती आहे की वाद मिटवा आणि जातनिहाय जनगणना करा. हीच मागणी राहुल गांधींनीही केली आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास सगळ्या समाज बांधवांना न्याय देता येईल. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारखे मूळ मुद्दे बाजूला पडत आहेत.
भाजपात वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्यांची घरं फोडणारी ही पार्टी आहे मात्र आता त्यांच्याच घराला भगदाड पडणार आहे. मी आत्ता कुणाही एका नेत्याविषयी बोलणार नाही. येत्या काळात तुम्हाला समजेलच. पंकजा मुंडे यांच्याशी आत्तापर्यंत काहीही बोलणं झालेलं नाही. ते झालं तर आम्ही तुमच्या समोर येऊ असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.