Nana Patole News : वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही ही माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांनी दिलेली शिकवण मी डोक्यात ठेवली आहे. तसंच मुख्यमंत्रिपदासाठी आशावादी असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. नाना पटोलेंनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या गळ्यात भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा होती. याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पंढरपूमध्ये नेमकं काय घडलं?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात चक्क ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेली वीणा घातली, त्यानंतर नानांनी थेट ही वीणा गळ्यात घेऊनच देवाचे दर्शन घेतले. याबाबत नाना पटोलेंना विचारलं असता हा माझ्या डोक्यावर असलेला फोटाही कार्यकर्त्यांनी बांधला आणि वीणाही कार्यकर्त्यांनी गळ्यात घातल्याचं सांगितलं. तसंच जे काही नशिबात जे असेल ते होईल, असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता महाविकास आघाडीत नानांच्या या कार्यकर्ता प्रेमावरुन वादाची ठिगणी पडते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे पण वाचा- विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा; नाना पटोले म्हणाले, “ज्या आमदारांनी…”

भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात

लोकसभा निवडणुकीतल्या महाराष्ट्रातल्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. नाना पटोले आज विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली विणा घालण्यात आली. नाना पटोले हे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि धवलसिंह मोहिते पाटील मित्रमंडळी यांच्याकडून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी विणा नाना पटोले यांच्या गळ्यात घालण्यात आली. विशेष म्हणजे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी विणा गळ्यात घेऊनच नाना पटोले यांनी विठ्ठल दर्शन घेतले. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना आता नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून थेट पंढरीच्या वारीत झालेला उल्लेखाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीत याचे पडसाद कसे पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नाना पटोले यांनी आज वारीत सहभाग घेतला, तसंच त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतलं.

छगन भुजबळांच्या आरोपांवर काय म्हणाले नाना पटोले?

राज्यातील शिंदे सरकारवर सडकून टीका करत, “राज्य सरकारनेच महाराष्ट्र पेटवला असा थेट आरोप पटोले यांनी केला. सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे नाही, आज त्यांच्याच एका जेष्ठ मंत्र्यांनी हे दाखवून दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भुजबळ आणि पवार यांच्या आजच्या भेटीचा उद्देशच तो होता, हे सरकार लायकीचे नाही हेच त्यांनी दाखवून दिलं आहे”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.