शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. मूळ शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे गटानं पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं का? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

शिंदे गटाकडून पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं असून शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. शिंदे गटाच्या विलीनीकरणाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की, किमान दोन तृतीयांश सदस्यांनी कुठल्यातरी पक्षात विलीन झाले पाहिजे, अशी राज्यघटनेत तरतूद आहे. पण असं झालेलं नाही. त्यानंतर आता त्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असा तर्क दिला जात आहे. पण आता ही घटना घडून गेली आहे.”

हेही वाचा- “चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय” बंडखोर आमदार संजय शिरसाटांची बोचरी टीका!

“अध्यक्षांनी ज्या नेत्याला गटनेता म्हणून मान्यता दिली आहे किंवा प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. त्यांचा आदेश मोडलेला आहे. त्यामुळे व्हीप मोडला आहे, त्यात काही शंका नाही. राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यात जी तरतूद करण्यात आली आहे, त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार निलंबनाला पात्र आहेत” असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.