मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी मागे घेण्याचा मागणी शिंदे सरकारने राज्यपालांना केली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबाबत पत्रही दिले आहे. यावरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळण्याऐवजी भाजपाचे प्रचारक होणं दुर्दैवं” असल्याचा टोला सावंतांनी राज्यपालांना लगावला आहे.

हेही वाचा- “…नाहीतर अजित पवारांनी शिवसेना खाऊन टाकली असती” रामदास कदमांचा जोरदार हल्लाबोल!

गेल्या आठ वर्षांममध्ये भाजपाकडून देशातील लोकशाही उद्धवस्त

“देशातील लोकशाही व्यवस्था आणि संविधान अस्तित्वात राहेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ वर्षांममध्ये भाजपाकडून या देशातील लोकशाही उद्धवस्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी संविधानिक संस्थांचा दुरुपयोग केला गेला आहे. यामध्ये राज्यपाल ही संस्थादेखील सूटलेली नाही. त्यामुळे अशा महत्वाच्या पदावर भाजपाचा आदेश पालन करण्यासाठीच संघाचे, भाजपाचे नेत्यांची नियुक्ती केली जाते. या सगळ्याचा परिणाम भारताच्या लोकशाहीवर होणार आहे आणि या उद्धवस्त केल्या जाणाऱ्या व्यवस्था पुन्हा जोडता येणार नाहीत, ही सुद्धा धोक्याची घंटा आहे”, असे सावंत म्हणाले.

महाविकास आघाडीकडून राज्यपालांना १२ नावांची यादी

१२ नोव्हेंबर २०२० मध्ये ठाकरे सरकारनं राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी १२ नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. यामध्ये राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांचं नाव होतं तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांचं नाव देण्यात आलं होतं. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांचं नाव पाठवण्यात आलं होतं. यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली आहे तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे.

हेही वाचा- “…तर न्यायालयात दाद मागू” विधानपरिषेदच्या आमदारकीवरुन वडेट्टीवारांचा शिंदे सरकारला इशारा

शिंदे-फडणवीस गटाकडून नवी यादी

शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ नावं लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. या नावांवर अंतिम चर्चाही झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या नव्या यादीत कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.