राज्यामध्ये पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी आतापासून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप करत टीका-टीप्पण्णी करत आहेत. आता काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे नेते, खासदार अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 'भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर अशोक चव्हाण पिंजऱ्यातील पोपट झाले आहेत', अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. हेही वाचा : महायुतीत धुसफूस! “मंत्र्यांनी अजूनही सुधरावं…”, अजित पवार गटाच्या आमदाराचा इशारा विजय वडेट्टीवार काय म्हणाले? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यामधील कोणी म्हणतं की अजित पवारांना बरोबर घेऊ नये. त्यामुळे आता अजित पवार हे अमित शाह यांना भेटण्यासाठी मर्जीने गेलेत की मजबुरीने गेले आहेत? हे पाहावं लागेल", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार पुढे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाची निती अशी आहे की, मी परवा अशोक चव्हाण यांना पुण्यात पाहिलं. मध्यभागी बसणारे नेते असलेले अशोक चव्हाण यांना आता एका कोपऱ्यात बसवलं होतं. भविष्यात अशीच कोपरे शोधायची वेळ त्यांच्यावेळ येणार आहे. कोपरे शोधा आणि कोपऱ्यात बसा. जर ते (अशोक चव्हाण) चुकलेत का? तर मला असं वाटतं की स्वच्छंद वागणाऱ्या माणसाला पिंजऱ्यात कोडलं आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्यांचा पोपट झाला आहे. पोपटाला जे शिकवलं जातं तसं बोलावं लागतं, तसंच पोपट बोलला नाही तर पोपटाला जेवण मिळणार नाही", अशी बोचरी टीका विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीवर केली. अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका अर्थसंकल्पावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार यांनाही लक्ष्य केलं. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ धुळफेक करणारा आहे. काही लोकांनी मोदी सरकारला जो पाठिंबा दिला, त्यांची मर्जी सांभाळणारा हा अर्थसंकल्प आहे. इंडिया आघाडी निडणुकीच्या काळात जी आश्वासने दिली होती, ती चोरून त्याचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही. याचा अर्थ राज्यातील शिंदे सरकारची दिल्लीच्या दरबारी काहीही इज्जत नाही, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचं सरकार येत नाही. हे दिल्लीतल्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाला निधी देऊन उपयोग काय? या भावनेतून केंद्र सरकार काम करते आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं आहे. महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. या सरकारने आता महाराष्ट्राला ठेंगा दाखवला आहे, पण दोन महिन्यांनी राज्यातील जनता यांना ठेंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.