गेल्या काही काळापासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अलीकडेच पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. यानंतर पंकजा मुंडेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जात असल्याची चर्चा आहे. यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांचं भाजपात कधीपासून खच्चीकरण केलं जात आहे, याबाबत सूचक विधान वडेट्टीवार यांनी केलं. भारतीय जनता पार्टीला राज्यातील ओबीसी आणि बहुजनांचं नेतृत्व संपवायचं असतं. त्यांचा पक्षात वापर करायचा आणि फेकून द्यायचं, अशी भाजपाची वृत्ती आहे. पंकजा मुंडेंचाही अशाच पद्धतीने वापर करून घेतला, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी एकदा 'मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे' असं म्हटलं होतं. हे वाक्य मनुवादी विचारांच्या लोकांना अजिबात पटलं नाही. तेव्हापासून त्यांनी पंकजा मुंडेंचं खच्चीकरण करायला सुरुवात केली. आज भाजपात त्यांच्यावर जो अन्याय होत आहे. तो अन्याय संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. तो अन्याय किती सहन करायचा आणि पंकजाताईंची सहनशक्ती किती आहे, हे त्यातून दिसलं. परंतु, पंकजा मुंडेंचं नेतृत्व संपवण्यासाठी भाजपाने पद्धतशीरपणे रचना केली आहे. त्याचा पहिला भाग कारखान्यावरील कारवाईचा आहे. हेही वाचा- “ती नोटीस नव्हे, कारवाई आहे”, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा मुंडेंचं उत्तर पंकजा मुंडेंना तुम्ही ऑफर द्याल का? असं विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले, "पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत. त्या ओबीसी आणि बहुजन समाजाच्या नेत्या आहेत. त्यांनीच योग्य निर्णय घ्यायचा असतो. मी ऑफर देण्याला आणि माझ्या म्हणण्याला काही अर्थ नाही. पक्षात राहून 'राम' नाही, असं जेव्हा त्यांना वाटेल. तेव्हा त्यांनी निर्णय घ्यायला हवा."