शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सुरू केलेली सहमती एक्सप्रेस नेवासे तालुक्यात रुळावरून घसरली. राष्ट्रवादीच्या बहिष्कारामुळे काँग्रेस नेत्यांची बैठकच बारगळली.
नेवासे तालुक्यात आमदार शंकरराव गडाख व विखे समर्थक बाळासाहेब मुरकुटे, दिलीप वाकचौरे यांच्यात संघर्ष सुरू आहे. प्रचारादरम्यान तो अधिक उफाळून आला आहे. आज कुकाणा येथे वाकचौरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन केले होते. सभेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना पाठविले होते. दोन दिवसांपासून बैठकीची तयारी सुरू होती. पण अचानक कार्यकर्ते निघून गेले. विखे, वाकचौरे हे बैठकीस आले, पण कार्यकर्ते नसल्याने बैठक बारगळली. केवळ पन्नास कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी लागली. आ. गडाख यांनी बैठकीकडे पाठ फिरवली.
बैठक बारगळल्यानंतर पन्नास कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विखे यांनी आमचे घरातील भांडण आहे, ते मिटवू असे सांगितले. या वेळी वाकचौरे, विनायक देशमुख, मुरकुटे यांची भाषणे झाली. सौदाळा, भेंडा येथेही सभांना अल्प प्रतिसाद होता. राष्ट्रवादीने दौऱ्यावर बहिष्कार टाकलेला होता.