कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मात्र, यानिमित्ताने पक्षातील नेत्यांनीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी पुणे येथील पत्रकारपरिषदेत सनातनवर तत्काळ बंदी घाला अशी मागणी केली. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या यासंदर्भातील वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत दुफळी समोर आली आहे. मी मुख्यमंत्री असताना २०११ मध्ये केंद्राकडे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तेव्हाच्या गृहमंत्रालयाकडून त्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, असे सांगत पृथ्वीराज यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीही चव्हाणांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. सनातनवर बंदी घालण्याबाबत चव्हाण इतकेच गंभीर होते तर त्यांनी फक्त प्रस्ताव पाठवण्यापेक्षा मला एखादा फोन करायला पाहिजे होता. मी २०१३ मध्ये गृहमंत्रालयाची सूत्रे हाती घेतली. मात्र, दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांना या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आलेल्या अपयशातून त्यांचा निष्काळजीपणा सिद्ध होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले.