“आम्ही धर्माचा आदर करतो, त्याची जाहिरात…”, राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा आंदोलनावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

नाना पटोले म्हणतात, “खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल आणि फक्त हाच प्रश्न महत्त्वाचा आहे असे वाटत असेल, तर…!”

nana patole
(संग्रहीत छायाचित्र)

गेल्या काही महिन्यांपासून देशात हनुमान चालीसा पठण करण्याचा आंदोलनाचा नवाच प्रकार रुढ होऊ लागला आहे. यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार असा नारा दिल्यानंतर त्याची जोरदार चर्चा झाली. राणा दाम्पत्याला त्यावेळी अटक आणि नंतर काही दिवसांनी जामिनावर सुटका देखील झाली. यानंतर आज राणा दाम्पत्य अमरावतीत परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान चालीसा पठण करून त्यांना विरोध केला जात आहे. मात्र, यावेळी काँग्रेस अशा आंदोलनापासून दोन हात लांबच आहे. यासंदर्भात विचारणा केली असता काँग्रेसचे नागपूरमधील नेते नाना आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

“आम्हाला काहीही रस नाही”

राणा दाम्पत्याच्या आंदोलनात आम्हाला कोणताही रस नाही, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. “खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल आणि फक्त हाच प्रश्न महत्त्वाचा आहे असे वाटत असेल, तर यात कॉंग्रेसला काहीही रस नाही”, असे नाना पटोले म्हणाले आहेत. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मी हिंदू आहे, मी वारंवार…”

दरम्यान, धर्म आमच्यासाठी आस्थेचा विषय असल्याचं नाना पटोले म्हणाले. “हनुमान चालीसा वगैरे प्रश्नांमध्ये आम्हाला कुठलाही रस नाही. मी हिंदू धर्माचा आहे. मी वारंवार सांगतो. मी हनुमान चालीसा घरी वाचतो. आमचा धर्म आमच्या आस्थेचा विषय आहे. पण आज अनेक महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बद्दलवण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नाहीये. हे सगळे प्रश्न असताना कॉंग्रेसला हनुमान चालीसाच्या मुद्द्यात रस नाही”, असं नाना पटोले म्हणाले. “मला राणा दाम्पत्याबद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. तो आमचा विषय नाही. आम्ही धर्माचा आदर करतो. त्याची जाहिरात करत नाही”, असेही पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress mah president nana patole on navneet rana hanuman chalisa pmw

Next Story
“…तर माझ्यावरही बॅन आणा, मिटकरी बाजूलाच राहिला”, अजित पवारांचं टीकाकारांना प्रत्युत्तर!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी