काँग्रेस नेत्यांवर टीकेची झोड उठवत पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या नारायण राणेंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नारायण राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

तुम्ही मला काय काढणार, मीच काँग्रेस सोडतो असे सुनावत नारायण राणे यांनी गुरुवारी काँग्रेसला रामराम केला. अशोक चव्हाण हे राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पात्र नसून पक्षाने विधीमंडळात विधायक काम केले नाही. पण मला अडचणीत आणण्याचे काम चव्हाण यांनी केल्याचा आरोप राणेंनी केला होता. राज्यसभेच्या उमेदवारासाठी माझे नाव आघाडीवर असताना पी. चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली. माझ्याविरोधात चव्हाण दिल्लीत ठाण मांडून होते असे राणेंचे म्हणणे आहे. चव्हाण यांनी पक्ष वाढवण्यासाठी नव्हे तर पक्ष संपवण्यासाठी काम केले असा आरोपही त्यांनी केला होता.

नारायण राणेंनी आरोप केले असतानाच गुरुवारी संध्याकाळी अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. नारायण राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे मला माध्यमांमधून समजले. पण त्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नाही. मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे त्यांनी सांगितले. याविषयी अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करून काँग्रेसने नारायण राणे यांना हादरा दिला होता. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या अनपेक्षित कारवाईमुळेच राणे यांना तातडीने शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार हुसेन दलवाई यांनी दिल्लीदरबारी कारवाईकरिता आग्रह धरला होता. यामुळेच राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले होते.