Harshawardhan Sapkal : मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं असून स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी याचा तीव्र निषेध केलाय. मात्र, यावरून आता एक वेगळाच वाद सुरू झालाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. कारण, त्यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांना म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, त्याच मांदियाळीत टिपू सुलतान आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता.टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. ते एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दालनातील फोटो काढला
गेल्या शनिवारी मालेगाव पालिकेच्या महापौरपदी नसरीन बानो (इस्लाम पक्ष) आणि उपमहापौरपदी शान-ए-हिंद (समाजवादी पार्टी) यांची निवड झाली. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावण्यात आले. शुक्रवारी ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शहरात एकच खळबळ उडाली. हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना (शिंदे गट) ने यावर तीव्र आक्षेप घेतला. हे कृत्य शहरवासीयांच्या भावना दुखावणारे आणि शासकीय नियमांची पायमल्ली करणारे असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाने केली. दरम्यान, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तीव्र विरोधामुळे महापालिकेच्या नगरसेवक विभागाने हस्तक्षेप करत हे छायाचित्र दालनातून काढून टाकले आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण प्रचंड तापले होते.
मुख्यमंत्री संतापले
“टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचे काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. हे अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारून मोगलांच्या जोखडाून सामान्यांना मुक्त करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य निमाण केले. त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानशी महाराजांची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन या जन्मात मी बघितले नाही, अशी संतप्त टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
