भिवंडीत काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडून आले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीही साथ लाभली. मात्र सत्तास्थापनेसाठी ४६ नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे मागचे २५ दिवस महापौर कुणाचा होणार? याचा फैसला होत नव्हता. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी भिवंडीत काँग्रेसचा महापौर होईल असं सांगत नेमका फॉर्म्युला काय असेल हेदेखील स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

“भिवंडीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. आम्हाला सर्वाधिक जागा भिवंडीने दिल्या आहेत. आमचे सर्वाधिक ३० नगरसेवक महापालिका निवडणुकीत भिवंडीतून निवडून आले आहेत. सत्तास्थापनेसाठी ४६ नगरसेवकांची आवश्यकता आहे. १६ जागा आम्हाला कमी पडत आहेत. त्यामुळे आघाडीचं राजकारण करणं हे परंपरेला धरुन आहे. त्यामुळेच आम्ही सेक्युलर फ्रंट स्थापन केलं. यामध्ये सर्वात आधी आमच्या सहकारी पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक आमच्यासह आले. आमची संख्या ४२ झाली. पण मॅजिक फिगर गाठू शकलो नाही. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला पण कोंडी फुटली नाही. त्यामुळे महापौर पदासाठी आम्ही वेगवेगळे अर्ज दाखल केले. काहीही झालं तरीही आम्ही भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह जाणार नाही. वेगवेगळे प्रस्ताव आले पण आम्ही तडजोड केली नाही.” असं सपकाळ म्हणाले.

नारायण चौधरी एका गटासह आमच्याबरोबर आले आहेत-सपकाळ

काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून आम्ही चर्चा करत होतो. भाजपा सोडून कुणी आलं तर तर आम्ही त्यांचा विचार करु हे आम्ही आधीच म्हटलं होतं. त्यानुसार नारायण चौधरी हे आले आहेत. त्यांनी त्यांचा गट वेगळा केला आहे. भाजपापासून त्यांनी फारकत घेतली आहे आणि सेक्युलर फ्रंटमध्ये समावेश करावं म्हणून त्यांनी विनंती केली होती. त्यांनी भाजपाचा विचारही सोडला आहे. काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे महापौरपदाचा निर्णय आम्हाला घ्यायचा आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. लवकरच निरीक्षक तिथे जातील आणि नगरसेवकांशी चर्चा करतील.नारायण चौधरी हे काँग्रेस प्रणित आघाडीचे सदस्य राहतील त्यांनी भाजपा आणि त्यांचा विचार सोडून आमच्या आघाडीत प्रवेश केला आहे असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आहे.

बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी काय सांगितलं?

आमच्या सेक्युलर फ्रंटमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि समाजवादी पक्ष असे तीन पक्ष आहे. मात्र मागचे २५ दिवस काँग्रेस ३० आणि राष्ट्रवादी १२ असे ४२ चं संख्याबळ आमच्याकडे होतं. ९ फेब्रुवारीला मी आवाहन केलं होतं की सेक्युलर फ्रंटमध्ये समाजवादीने यावं महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल. जर समाजवादी पक्ष आला तर त्यांना चार पावलं मागे जाऊन आम्ही त्यांना उपमहापौर पद द्यायला तयार आहोत. विलास पाटील आले तर त्यांनाही हे पद द्यायला तयार होतो. पण कुणीही आलं नाही. जनतेने सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून दिले.