महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या दिग्गजांची बठक उद्या (शुक्रवारी) होणार आहे. खासदार अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासह विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या सर्वाना बैठकीस आमंत्रित केले असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी केल्यानंतर विविध मागण्यांसाठी सिल्लोड येथे दुष्काळ परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने येणाऱ्या नेत्यांसमवेत महापालिका निवडणुकीची ध्येयधोरणे ठरविली जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी माजी आमदार राजेंद्र दर्डा, कल्याण काळे, जितेंद्र देहाडे व एम. एम. शेख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. बठकीला यायचे की नाही, हे मात्र या नेत्यांनी ठरवावे, असे सत्तार म्हणाले. माजी मंत्री दर्डा कोणत्याच बठकीस येत नसल्याचा संदर्भ त्यांच्या वक्तव्यास होता. शहरातील सर्व वॉर्डामध्ये उमेदवार उभे केले जातील. निवडणूक पूर्ण ताकदीने लढविली जाईल. महापालिकेवर शिवसेना-भाजपशी दोन हात करण्यासाठी एमआयएम पक्षाशी युती होईल काय, असे विचारले असता सत्तार म्हणाले, की त्यांच्याशी युती करणे म्हणजे सेनेशी युती करण्यासारखेच आहे. हे दोन्ही पक्ष जातीय व धर्माच्या आधारावर निवडणूक लढवितात. त्यामुळे तसा कोणताच विचार करता येणार नाही. उद्याच्या बठकीत महापालिकेतील वॉर्डनिहाय शक्ती तपासली जाईल. त्या आधारे धोरण ठरविले जाईल. राष्ट्रवादीशी आघाडी करायची की नाही हे आघाडी कोणत्या संख्याबळावर ठरते यावर अवलंबून असेल. त्यांनी अवाजवी मागणी न केल्यास राष्ट्रवादीबरोबर युती होऊ शकते, असेही सत्तार म्हणाले.
गोरंटय़ाल काँग्रेससोबतच!
गेल्या काही दिवसांपासून जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटय़ाल भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात होती. प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांची घोषणा होण्यापूर्वी गोरंटय़ाल यांच्याशी या विषयावर चर्चा झाली होती. भाजपमध्ये ते जाणार, अशी चर्चा होती. आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली. चर्चा झाली असली, तरी गोरंटय़ाल काँग्रेसबरोबरच आहेत आणि राहतील, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.