शिंदे गटाचा गुरूवारी ( २९ सष्टेंबर ) हिंदू गर्व गर्जना मेळावा जालन्यात पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली होती. याला आता कैलास गोरंट्याल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला आहे.

कैलास गोरंट्याल हे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. “अब्दुल सत्तार यांना विधानपरिषदेवर मी पाठवले. माणिकदादा पालोतकर यांनी नगराध्यक्ष, मी आमदार, अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं, त्यांचे ते झाले नाही. विलासराव देशमुख आणि नारायण राणेंचे सुद्धा ते झाले नाहीत. बिचाऱ्या एकनाथ शिंदे यांचे कसं होणार? जिकडे डम-डम उधर हम, असं अब्दुल सत्तारांचं आहे,” अशा शब्दांत गोरंट्याल यांनी सत्तार यांचा समाचार घेतला.

हेही वाचा – “मी राज ठाकरेंचा मोठा चाहता, त्यामुळे…”; सुजय विखे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

“…तर एकनाथ शिंदे कोण आहेत?”

“अब्दुल सत्तार हे सत्तेतील मीठाचा खडा आहे. एकनाथ शिंदेंना भाजपा, शिवसेना अथवा उद्धव ठाकरेंपासून नाहीतर, अब्दुल सत्तांरांपासून धोका असल्याचं दादा भुसे यांना मी सांगितलं. अब्दुल सत्तार गद्दार असून, कोणाचेही नाही. एवढ्या सर्व लोकांनी त्यांना आशीर्वांद दिला, त्यांचे झाले नाहीत. एकनाथ शिंदे कोण आहेत?,” असेही कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं.