Sajid Khan Pathan Bishnoi gang threat: अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि साजिद खान पठाण यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. विधानसभेचे अध्यक्षांनी याप्रकरणाची दखल घेण्याची सूचना सरकारला केली. दरम्यान, पठाण यांना देण्यात आलेल्या धमकीच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केले आहे. यात एक व्यक्ती पठाण यांना, ही शेवटची वॉर्निंग असल्याचे म्हणत, “आता फोन येणार नाही थेट गोळी येईल”, अशी धमकी देत आहे.

काँग्रेस नगरसेवकाच्या फोनवर आला कॉल

आमदार साजिद पठाण यांना यापूर्वी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी यांना धमकी मिळाली होती. त्यानंतर ३० जून रोजी पठाण यांना बिश्नोई गँगकडून खंडणीसाठी धमकी देण्यात मिळाली आहे. काँग्रेस नगरसेवक आकाश कावडे यांच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. कवडे यांना आलेल्या फोनवर समोरील व्यक्ती पठाण यांना संदेश पोहोचविण्याची मागणी करत ही शेवटी वॉर्निंग असल्याची धमकी देत आहे. काँग्रेसने या फोन कॉलची रेकॉर्डिंग एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केली आहे.

बिश्नोई गँगच्या व्यक्तीने काय धमकी दिली?

“साजिद खान यांना माझा हा शेवटचा संदेश द्या, त्यांना सांगा ही शेवटची वॉर्निंग आहे. पैशांची व्यवस्था करा नाहीतर मरायला तयार व्हा असे सांगा. असे हाल करु की पूर्ण अकोला लक्षात ठेवेल. माझ्या फोनची रेकॉर्डिंग करायची तर करा. मी अकोल्याचाच आहे कॅनडापर्यंत पोहोचलो आहे. आता फोन येणार नाही थेट गोळी येईल, असा मेसेज माझा साजिद पर्यंत पोहोचवा. उद्यापर्यंत पैसे तयार ठेवा, दुपारी दोन किंवा अडीच वाजता फोन करतो, हो किंवा नाही म्हणून उत्तर द्यायचं, मग आम्हाला जे करायचंय ते करु”, धमकी समोरील व्यक्ती देत आहे. फोन करणारा व्यक्ती स्वत:चे नाव शुभम लोणकर असे सांगत आहे. (आम्ही ऑडीओची पुष्टी करत नाही.)

काँग्रेसने सरकारवर केली टीका

“ऐन अधिवेशन काळात पठाण यांना बिश्नोई गँगकडून खंडणीसाठी पुन्हा जीवे मारण्याची धमकी येणे, हा महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे लक्षण आहे. राज्याचे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे? भारताचे गृहमंत्रालय फक्त विरोधी आमदार-खासदार यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे का?”, असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले.

“गृहखात्याच्या या निष्क्रीयतेमुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, सरकारने हे राजकीय खेळ थांबवून आमदार साजिद पठाण यांना तात्काळ कडक सुरक्षा पुरवावी आणि धमकी देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करावा”, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

आमदार साजिद खान पठाण काय म्हणाले?

“मला जेव्हा पहिल्यांदा धमकी आली होती, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी मला रात्री १२ वाजता फोन केला होता. माझी चौकशी केली. पण काल पुन्हा मला धमकी आली. उद्या बाबा सिद्दीकी प्रमाणे माझाही खून झाला तर मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता. त्या मंदिराचे बांधकाम विधानसभा अध्यक्षांनी करून घ्यावे. मला सुरक्षा नको आहे, मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता. तो देण्यात यावा,” असे धमकीबाबत सभागृहात बोलताना आमदार साजिद खान पठाण म्हणाले.