Maharashtra Assembly MLA Sajid Pathan News: काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना फेब्रुवारी २०२६ मध्ये जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटले. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि साजिद खान पठाण यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच सरकारने मागेच या धमक्या गंभीरतेने घेतल्या असून त्याचा तपास सुरू असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर स्वतः साजिद खान पठाण यांनी केलेल्या एका टिप्पणीची सध्या चर्चा आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरताना एका आमदाराला टोळीकडून वारंवार धमकी मिळणे योग्य नसल्याचे म्हटले. यावर सरकारची भूमिका मांडताना नितेश राणे म्हणाले की, सदर धमकी सरकारने गंभीरपणे घेतली आहे. सभागृहातील एकाही सदस्याला मिळणारी धमकी खपवून घेतली जाणार नाही. आमदारांकडे जे पुरावे आहेत, ते पोलिसांकडे द्यावेत. त्यावर नक्की कारवाई होईल.
बिश्नोई गँग मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही – पटोले
नाना पटोले यांनी सरकारचा दावा खोडून काढताना बिश्नोई गँग मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही, अशी टीका केली. “मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली, हे खरे आहे. गुंडांना सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही काल पुन्हा साजिद खान पठाण यांना धमकी मिळाली. याचा अर्थ बिश्नोई गँग मुख्यमंत्र्यांचे ऐकायला तयार नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनीही या विषयावर भाष्य केले. साजिद खान पठाण यांना ज्या मोबाइल क्रमाकांवरून धमकी आली आहे, त्याची माहिती त्यांनी अध्यक्षांना द्यावी. त्याची चौकशी सरकार करेल. तसेच आमदारांना संरक्षण देण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या जातील. जर संरक्षण वाढविण्याची गरज भासली तर पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून तसा निर्णय घेतला जाईल, असे शंभूराज देसाई म्हणाले.
माझा खून झाला तर…
आमदार साजिद खान पठाण यांनी धमकीबाबत माहिती देताना म्हटले की, मला जेव्हा पहिल्यांदा धमकी आली होती, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी मला रात्री १२ वाजता फोन केला होता. माझी चौकशी केली. पण काल पुन्हा मला धमकी आली. मी धमक्यांना घाबरत नाही. मी जर घाबरलो असतो तर मी काल घरातून बाहेर पडलो नसतो. पण माझी एक मागणी राहून जाईल, ते आधी मी सांगतो.
साजिद खान पठाण पुढे म्हणाले, “sउद्या जर बाबा सिद्दीकी प्रमाणे माझाही खून झाला तर मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता. त्या मंदिराचे बांधकाम विधानसभा अध्यक्षांनी करून घ्यावे. मला सुरक्षा नको आहे, मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता. तो देण्यात यावा.”
