अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार कक्ष मिळवण्यासाठी विनंती करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी खासदार कक्षाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतले. त्याआधी याच मुद्द्यावरून यशोमती ठाकूर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाला.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जनसुविधा केंद्र उघडण्यात आले आहे. आतापर्यंत माजी खासदार नवनीत राणा या कार्यालयाचा वापर करीत होत्या. बळवंत वानखडे हे निवडून आल्यानंतर संबंधित कक्षाचा ताबा मिळावा, यासाठी काँग्रेसने पत्रव्यवहार केला. पण प्रशासनाने त्यांना ताबा दिला नाही. बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला होता.

हेही वाचा >>>देवाच्या नावावर शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणाऱ्यांना देवही माफ करणार नाही – खा. धैर्यशील माने

दरम्यान शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वार्षिक योजना आढावा बैठकीसाठी अमरावतीत आगमन झाले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी कार्यालय मागितले. यावर चंद्रकांत पाटील यांनी हे प्रकरण समजून घेण्यासाठी वेळ द्या, असे सांगितल्याने यशोमती ठाकूर संतापल्या. नवीन खासदाराचा सन्मान केला जात नाही. हे सर्व खपवून घेतले जाणार नाही. वाटल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही आज कार्यालयाचा ताबा घेणारच, असे सांगून तेथून बाहेर पडल्या व त्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने खासदार कक्षाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.