१८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोहचणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळी शेगावात पोहोचून नियोजन आणि रस्त्यांचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्यसभेचे खासदार मुकुल वासनिक यांनी रविवारी शेगाव शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साध ‘भारत जोडो यात्रा’ ही संपूर्ण देशाला जोडणारी यात्रा ठरणार आहे, असं विधान केलं.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार निशाणा साधला. गुजरातच्या मोरबी येथे घडलेला अपघात हा गुजरातमधील भ्रष्टाचाराचं फळ आहे. मोरबी येथील पूल दुरुस्तीचं काम पूर्ण होण्याआधीच हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळेच हा अपघात घडला आणि या अपघातामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला.




या अपघातानंतर गुजरात सरकारने तिकीट विक्री करणाऱ्या आणि वेल्डिंग करणाऱ्या किरकोळ मजुरांना पकडलं आहे. मात्र, पूल सुरू करण्याचे आदेश देणाऱ्यांना अद्यापही अटक झाली नाही. गुजरात मॉडेलचं हे फार मोठं उदाहरण आहे. या पुलाच्या बांधकामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारामुळेच शेकडो लोकांचा जीव गेला. त्यामुळे नरेंद्र मोदींनी काँग्रेसबद्दल बोलण्यापेक्षा गुजरातमधील भ्रष्टाचाराबाबत बोलावं, असंही खासदार मुकुल वासनिक म्हणाले.
हेही वाचा- Gujarat Election: मंत्रीपदावरून गच्छंती झालेले भाजपा नेते सुरतची जागा कायम राखणार?
देशात सध्या हुकूमशाही व्यवस्था निर्माण झाली आहे. देशातील विस्थापित अजुनही विस्थापित आहेत. देशातील निवडक प्रस्थापितांकडे संपत्ती केंद्रीत करण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. यातून भारत देश एकसंध राहील, असं दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण देशात कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. ही यात्रा १८ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातून राज्यात प्रवेश करणार आहे. पाच जिल्ह्यांत सुमारे ३८० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे, अशी माहिती मुकुल वासनिक यांनी दिली.