scorecardresearch

“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”

“महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री गुजरातमध्ये गेले होते काय?”

“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”
"महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री गुजरातमध्ये गेले होते काय?"

राज्य सरकारकडून राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक-दोन नाहीतर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यानतंर विरोधक टीका करत असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? असा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.

नाना पटोले काय म्हणाले –

“शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे,” असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला.

फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…

“महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री गुजरातमध्ये गेले होते काय?”

शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच मोदी-शाह यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगतात. महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला ते गेले होते काय ? असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला आहे.

पालकमंत्रीपदावरून अजित पवारांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

“राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत आहे, दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सारख्या दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

“महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत आहे”

“राज्यातील ईडीचे सरकार असंवैधानिक आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत. दुसरीकडे महागाईने जनता त्रस्त आहे. मध्यमवर्गही महागाईने पिचला आहे पण केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या महागाई राज्य सरकारने कमी करावी असे म्हणत आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत आहे, त्यामुळे निर्मला सितारमण यांनी सांगितल्याप्रमाणे महागाई कमी करण्यासाठी ते काय करतात ते पहावे लागेल,” असं नाना पटोलेंनी सांगितलं.

“अतिवृष्टीग्रस्तांना अजून सरकारी मदत नाही”

“आधीच या सरकारने मंजूर विकासकामांना स्थगिती दिलेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील रस्ते अत्यंत खराब आहेत. रस्त्यात खड्डे आहेत, का खड्ड्यात रस्ते, हेच कळत नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले, सोयाबिन गेले, भाजीपाला, फळबागा, सर्व काही वाया गेले असतानाही पंचनामे व्यवस्थित केलेले नाहीत. अमरावती, अकोला यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यातील परिस्थिती मी पाहिली, पण सरकारची उदासिनता दिसून येते. शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेले नाही. राज्यातील ईडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

“भारत जोडो यात्रेच्या प्रतिसादाने घाबरलेल्यांकडून काँग्रेसबद्दल अफवा पसरवण्याचे उद्योग”

“राहुल गांधी यांचा साधेपणा व नम्रपणा लोकांना भावतो आहे, त्यामुळेच ‘भारत जोडो’ यात्रेत लोकांचा पाठिंबा वाढत आहे. पण काही विकृत मनोवृत्तीचे लोक पदयात्रेला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश येणार नाही. जे लोक यात्रेमुळे घाबरलेले आहेत ते जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाविषयी व पक्षातील काही नेत्यांबद्दल अफवा पसरवत आहेत. महाराष्ट्र ही पदयात्रा सर्वात मोठी व्हावी यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जाणार आहे,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या