नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीवरून गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी सत्यजीत तांबेंची बंडखोरी, त्यानंतर त्यांचा निवडणुकीत झालेला विजय या गोष्टी काँग्रेसमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण करत असताना या सगळ्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक सुरू होताना दिसत आहे. सत्यजीत तांबेंना उमेदवारी नाकारल्याची नाराजी उघडपणे बोलून दाखवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पटोले विरुद्ध थोरात वाद!

सत्यजीत तांबे यांची उमेदवारी आणि त्याअनुषंगाने पक्षात झालेल्या राजकारणावर बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्यांनी पक्षातील काही वरीष्ठ नेतेमंडळींशी चर्चा करून ‘नाना पटोलेंसोबत काम करणं आता अवघड झालंय’, असं थोरातांनी सांगितल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी बाळासाहेब थोरातांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. थोरातांनी थेट हायकमांडला राजीनामा पाठवला असून अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही, असं बोललं जात आहे.

“राजीनामा आमच्याकडे आलाच नाही”

दरम्यान, थोरातांनी राजीनामा दिल्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसून अद्याप आमच्याकडे त्यांचा राजीनामा आला नसल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. “बाळासाहेब थोरातांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देणारं ट्वीट सकाळी केलं आहे”, असंही नाना पटोलेंनी माध्यमांना सांगितलं.

पदवीधर निवडणूक आणि राजकारण!

यावेळी बोलताना नाना पटोलेंनी नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने बरंच राजकारण शिकायला मिळालं, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मला काँग्रेसच्या विचारसरणीला पुढे नेऊन निवडणुकांमध्ये विजयी करायचं आहे. ते काम मी करत आहे. कोण काय राजकारण करत आहे त्यात मला पडायचं नाही. मी एक सामान्य शेतकरी माणूस आहे. मला या सगळ्या राजकारणात पडायचं नाहीये. मी सरळ मार्गाने या राजकारणात आलो आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

“मला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीदरम्यान मला राजकारणातल्या खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी आजपर्यंत ज्या गोष्टी केल्या नव्हत्या, त्या मला शिकायला मिळाल्या. पण मी या प्रकारचं घाणेरडं राजकारण कधीच नाही करणार”, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

“…म्हणून थोरात उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते”

“काल अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे माझ्यासह काँग्रेस उमेदवाराचा फॉर्म भरायला होते. आता कोणत्या गटबाजीची चर्चा चालू आहे हे मला माहिती नाही. बाळासाहेब थोरातांची प्रकृती ठीक नाहीयेय.बाळासाहेब थोरात आमचे विधिमंडळ पक्षनेता आहेत. मी स्वत: आमदार आहे. त्यांचा काही गैरसमज झाला असेल, तर त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आम्हाला काहीच अडचण नाही. त्यासाठी १५ तारखेला कार्यकारिणीची बैठक आम्ही बोलावली आहे. येत्या निवडणुकांमध्ये आमच्या आमदारांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. आगामी निवडणुकांची त्यात चर्चा होणार आहे”, असंही नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nana patole on balasaheb thorat resignation from party pmw
First published on: 07-02-2023 at 11:45 IST