एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात सुरू झालेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक गुरुवारी थेट राज्याच्या विधिमंडळात रंगण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी ३० जूनला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन देखील पाचारण करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना काँग्रेसनं राज्यपालांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच, याआधी न्यायप्रविष्ठ असणाऱ्या प्रकरणाबाबत राज्यपालांनी वेगळी भूमिका घेतली होती, असं देखील नमूद केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टीव्ही ९ शी बोलताना काँग्रेसची भूमिका मांडली आहे.

काय घडलं होतं विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत?

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला दिला. “जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत उच्च न्यायालयाने भाजपाला फटकारे लगावले होते. विधिमंडळाच्या कामकाजासाठी आमच्याकडे यायची गरज नाही असं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. पण भाजपा त्या काळात सर्वोच्च न्यायालयात गेली. तिथे हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. पण जेव्हा सरकारकडून राज्यपालांना विनंती करण्यात आली की विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आम्हाला घ्यायची आहे, तेव्हा राज्यपालांनी लिहून पाठवलं होतं की न्यायिक प्रक्रियेत हे असल्यामुळे मला यावर कार्यवाही करता येणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

Maharashtra Political Crisis Live : “राज्यपालांनी याआधीही अनेकदा घटनेचं उल्लंघन केलंय”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची भूमिका!

“राज्यपालांची भूमिका खेदजनक!”

राज्यपालांनी या प्रकरणात घेतलेली भूमिका खेदजनक असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. “या प्रकरणात माझा साधा प्रश्न आहे की शिवसेनेने आपला गटनेता बदलला आहे. मग उद्या विधानसभेत कुणाचा व्हीप लागू होईल? न्यायालयात याच प्रकरणाची सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत वेगळी भूमिका घेतात. मग काल रात्रीतून असं काय घडलं? भाजपा तर नेहमी सगळ्या गोष्टी अंधारातच करते. कालही सगळ्या घडामोडी अंधारातच झाल्या. लगबगीनं बहुमत सिद्ध करण्यासाठी ४८ तासांची मुदत देत अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी का काढावेत? हा एक मोठा चमत्कार आहे. न्यायिक व्यवस्थेचं उल्लंघन करणारी ही बाब राज्यपाल करत असतील तर महाराष्ट्रासाठी हे खेदजनक आहे”, अशा शब्दांत नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.

“सरकार पडू दे, मग तुला मारू”, किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी; पत्रात अजित पवारांचंही नाव!

“विधानभवन काही आखाडा नाही”, नानांनी भाजपाला सुनावलं

“ज्याच्याजवळ बहुमत असेल, त्याचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही ओढून-ताणून अंधारात सरकार बनवणारे लोक नाही. राज्यपाल ज्या पद्धतीने भाजपाचा अजेंडा राबवत आहेत, त्यावर आमचा आक्षेप आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी आम्हाला कोर्टाचा हवाला देत पत्र पाठवलं होतं. आता शिवसेनेचा गटनेता वेगळा आहे. बंडखोर गटाला हे मान्य नाही. मग उद्या विधानसभेत किती मोठा आखाडा होईल. विधानभवन म्हणजे काही आखाडा नाही. बाहेर जसं बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं जातं, मारलं जातं हा आखाडा विधानसभेत करता येणार नाही. न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहाता विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देणं हे कुठल्या कायद्याच्या पद्धतीत बसतं?” असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

“काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की दु:खात किंवा सुखात सोबत राहायचं. ज्याच्या घरात मोठं व्हायचं, त्याचंच घर पोखरायचं ही आमची भूमिका नाही. सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत. वेळ आली तर बाहेरून पाठिंबा देऊ असंही सांगितलं आहे. आम्हाला २०१९मध्ये विरोधात बसण्याचाच कौल मिळाला आहे. तो आम्ही स्वीकारला आहे. त्यामुळे विरोधात बसायला आम्हाला काहीही अडचण नाही. पहाटेचं सरकार पडलं नसतं, बेबनाव झाला नसता तर आम्ही विरोधात बसलोच असतो. आम्ही ते सरकार पाडलं नाही. त्या घटना घडल्यानंतर राज्यात स्थिरता राहावी, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावं यासाठी सोनिया गांधींनी हा प्रयत्न केला होता. काँग्रेस तेव्हाही महाविकास आघाडीच्या पाठिशी होता, आजही आहे”, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आहे.