‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचा खुलासा; म्हणाले, “हे तर माध्यमांनीच वाढवून सांगितलं!”

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाळतीसंदर्भात केलेल्या विधानावर पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

nana patole on spying allegations cm uddhav thackeray ajit pawar
नाना पटोलेंनी पाळतीसंदर्भात केलेल्या विधानावर खुलासा केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचं विधान नाना पटोले यांनी केल होतं. मात्र, या विधानावरून विरोधकांच्या टीकेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर आता नाना पटोले यांनी आपल्या त्या विधानावर सारवासारव करत खुलासा केला आहे. माझं ते विधान माध्यमांनीच वाढवून सांगितलं, अशा गोष्टी होत असतात असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आ मुद्द्यावरून आता नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होण्याची शक्यता आहे.

केंद्र-राज्य सरकारचं लक्ष!

आपली भूमिका मांडताना नाना पटोले यांनी सर्वच गोष्टींविषयी केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष असल्याचं सांगितलं. “माध्यमांवर देखील राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष असतं. आपण जे काही बोलतोय, त्यावर देखील त्यांचं लक्ष असतंच. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर लक्ष ठेवतात असं माध्यमांनी वाढवून सांगितलं. महाविकासआघाडी सरकारमध्ये एकमत आहे. राज्याच्या विकासाचं आमचं धोरण आहे. त्या आधारावर हे सरकार चालत आहे. काँग्रेसच्या महागाईविरोधातल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ३ दिवसांपूर्वीच्या एका भाषणातली क्लिप काढून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आमच्याबद्दल असं कितीही कटकारस्थान केलं, तरी काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडत राहणार आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न

दरम्यान, यावेळी बोलताना नाना पटोले यांनी मूळ मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. “केंद्र सरकारने देशाला लुटायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला काँग्रेसकडून विरोध केला जाणार आहे. केंद्र सरकार रोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवत आहे. चीनचं सैन्य देशात घुसलंय त्याबाबत देखील भाजपा काही उत्तर देत नाहीये. या सगळ्या विषयांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात काँग्रेस नेत्यांमध्ये गोंधळ आहे अस माध्यमांच्या माध्यमातून कुणी पेरतंय. ते चुकीचं आहे”, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पाळत ठेवत असल्याच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

भाजपाची पटोलेंवर खोचक टीका

यासंदर्भात बोलताना भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंना खोचक टोला लगावला आहे. “नाना पटोलेंनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. रोज मरे, त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झाली आहे. ते येतात जोरात. कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील. त्यामुळे त्यांनी त्या ताकदीने मांडल्या. पण नंतर अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

नाना पटोलेंची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झालीये – वाचा सविस्तर

नाना पटोलेंनी काय म्हटलं होतं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. “महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress nana patole on spying allegations on cm uddhav thackeray dy cm ajit pawar pmw