गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेनं पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला नकार दिला. शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. मात्र संभाजीराजेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीत वैचारिक मतभेद असल्यांच चित्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे आता संभाजीराजे छत्रपती पुन्हा खासदार होणार नाहीत हे स्पष्ट झालंय. यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भातही उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. “मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला,” असं म्हणत संभाजीराजेंनी शिवसेनेचा पाठिंबा न मिळाल्याबद्दल खेद व्यक्त केलाय.

संभाजीराजेंच्या या पत्रकार परिषदेनंतर आता नाना पटोलेंनी ट्विटवरुन या प्रकरणावर भाष्य करताना संभाजीराजेंनी खासदार न होणं दुर्देवी असल्याचं म्हणत काँग्रेसचा कायमच त्यांना पाठिंबा राहील असं म्हटलंय. “इतर पक्षांचे माहीत नाही परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत अशी काँग्रेसची मनापासून इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्देवी. पसंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील,” अशी पोस्ट नाना पटोलेंनी केलीय.

अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत होते संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपासून भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत अपक्ष म्हणून आपल्याला सर्व पक्षांनी पुढाकार घेऊन पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेनं आपलाच उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार म्हणून संभाजीराजेंनी निवडणूक लढवावी, अशी अट त्यांना घालण्यात आली होती. मात्र, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय अंतिम असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nana patole says we will always support sambhajiraje chhatrapati he should have been mp scsg
First published on: 27-05-2022 at 15:43 IST