काँग्रेस ‘ओबीसी सेल’ प्रदेशाध्यक्षांची टीका

सोलापूर : शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात केवळ नऊ  जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे हा पक्ष काका-पुतण्याच्या ताटाखालील मांजर होऊ  शकत नाही, अशी खणखणीत प्रतिक्रिया काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी व्यक्त केली.

शनिवारी, सोलापुरात पक्षाच्या ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आल्यानंतर माळी यांनी एका पत्रकार परिषदेत आगामी काळात राज्यात काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, की राज्यात महाआघाडी सरकारमध्ये सत्तेचा भागीदार असूनही काँग्रेसची मोठी घुसमट होत आहे. त्याबद्दल पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेत मंत्रिपदे आणि मिळणारा निधी खूपच कमी असल्याची भावना माळी यांनी बोलून दाखविली. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना आपली भूमिका पटवून दिल्याचा दावाही त्यांनी केला.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात केवळ नऊ  जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे हा पक्ष काका-पुतण्याच्या ताटाखालील मांजर होऊ  शकत नाही अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचा कर्ताकरविता असून भाजपच्या माध्यमातून संघ आपला ‘अजेंडा’ राबवित आहे. ‘आरक्षणमुक्त भारत’ निर्माण करण्याचाही प्रयत्ना संघाकडून भाजपच्या आडून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.