मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांवर आक्षेप नोंदवला. तसेच मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल, असा इशारा राज्य सरकारला दिला. ज्या मशिदींवर भोंगे वाजत असतील, त्या मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. राज ठाकरेंच्या या आवाहनानंतर अनेक ठिकाणी हनुमान चालिसा वाजवण्याचे प्रयत्न झाले. तर त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.


“भारत हा विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींचा देश आहे, देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. लोक धर्माबाबत अशी विधाने करतात, हे खरोखरच खेदजनक आहे, यातून त्यांची मानसिकता दिसून येते,” असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत राज ठाकरेंच्या लाऊडस्पीकरबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.


काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले होते की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा. यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार” असं राज ठाकरे म्हणाले होते.