सांगली : वादग्रस्त घनकचरा निविदेला विरोध करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असून याबाबत निविदा मंजुरीचा स्थायी समितीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्याचा निर्णय काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला. विरोधी पक्ष नेते संजय मेंढे यांनी या प्रकरणी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला.
भाजपचे बहुमत असलेल्या स्थायी समितीने वादग्रस्त घनकचरा प्रकल्पाची निविदा मंजूर केली असून याला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता, भाजप, काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे.
भाजपच्या दोन आमदारासह सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देऊन या ठरावाला विरोध असल्याचे सांगितले. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काँग्रेस सदस्यांची बैठक श्री. मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
शहराचे नुकसान करणारा हा प्रकल्प असल्याने निविदामध्ये बदल करण्याची गरज आहे. स्थायी समितीने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला असताना पुन्हा निविदा मंजुरी कशी होऊ शकते, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला असून निविदा मंजुरीचा ठराव रद्द करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
आयुक्तांनी निविदा मंजुरीचा ठराव रद्द केला नाही तर काँग्रेसच्यावतीने न्यायालायात जाण्याचा इशाराही मेंढे यांनी दिला. दरम्यान, काँग्रेसच्या या बैठकीस निविदा मंजुरीच्या ठरावाला अनुमोदन देणाऱ्या सदस्यांसह तीन नगरसेवक अनुपस्थित होते.
