काँग्रेस पक्षाची एक विचारधारा होती. पण, यंदाच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्याने, काँग्रेस पक्ष विचारधारेपासून दूर गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला भाजपाचे नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला लगावला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपाचे नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी अनेक मुद्दयांवर भूमिका मांडली.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेने अनेक आश्वासने दिली आहेत. त्यातील एक शेतकर्यांना 25 हजार रुपयांची कर्जमाफी देणार असे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर या सरकारने निर्णय घेऊन, शेतकर्यांना मदतीचा हात पुढे करावा”, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना सत्तेत येताच भाजपा सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक प्रकल्पांची चौकशी करीत आहे. त्यावर ते म्हणाले की, “त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या सहमतीने अनेक प्रकल्पाचे निर्णय घेतले गेलेत. त्यामुळे अशा अनेक प्रकल्पांची चौकशी करणे योग्य ठरणार नाही. त्यातील एक आपल्या सर्वांचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निधीची देखील चौकशी केली जाणार आहे. हे योग्य नसून या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे”, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.