congress prithviraj chavan reaction on balasaheb thorat s resignation zws 70 | Loksatta

कराड : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची सावध प्रतिक्रिया

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण पसरले.

कराड : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची सावध प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब थोरातांचा आज वाढदिवस असल्याने आपण त्यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. पण, आज नेमक्या काय घडामोडी घडल्या हे माहिती घेऊनच बोलेन असे चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा >>> VIDEO: बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर मुलगी जयश्री थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “ते जेव्हा दुःखी होतात…”

काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळातील वजनदार नेते बाळासाहेब थोरात यांनी आज चाहत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असतानाच दुसरीकडे पक्षांतर्गत वादातून थेट विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडताना राजकीय जाणकारांच्या भोवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसचा प्रभावी चेहरा असलेल्या बाळासाहेब थोरातांची  पक्षांतर्गत नाराजीतून विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तीव्र प्रतिक्रियेबाबत माध्यम प्रतिनिधींनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, थोरात यांनी नाराजीतून पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्याचे माध्यमांच्या बातम्यातूनच आपल्याला समजले. या संदर्भात मी अधिकृतपणे कोणाशीही बोललेलो नाही. पण, माहिती घेतोय. कराडमधून जाणाऱ्या महामार्गाच्या प्रस्तावित कामाविषयी आढावा घेणाऱ्या बैठकीत आज (मंगळवारी) मी व्यस्त होतो. त्यामुळे समाजमाध्यमावरील बातम्यातूनच काय ती माहिती मिळाली. बाळासाहेब थोरातांचा वाढदिवस असल्याने मी त्यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. पण माझं-त्यांचं काही बोलणं झालेलं नाही. पण, काही घडामोडी झाल्या असतीलतर हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल जास्त वाच्यता करणार नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण पसरले.

हेही वाचा >>>VIDEO: बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याने राज्यात चर्चांना उधाण; इंदुरीकर महाराजांचं सूचक विधान, म्हणाले, “कोणत्याही दगडाची…”

काँग्रेसची ही हक्काची जागा होती. आता तेथील निकालाने सभागृहातील काँग्रेसचे संख्याबळ एकने घटल्याचा गंभीर विषय असून, त्याची पक्षश्रेष्ठींकडून चौकशी होत आहे. या एकूणच घटनाचक्रात कोणाची चुकी आहे. जे घडले ते टाळता आले असते का? हे जाणून घेतले जाईल. याबाबत अधिक जाहीर बोलता येणार नाही. आमची आता १५ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठक होणार असल्याने त्यावेळी सर्व भेटतील, चर्चा होईल. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 20:10 IST
Next Story
सांगली : महिलेचा खून करुन लूट; दरोडेखोरांच्या टोळीला अटक