मुंबई : देशातील जनतेवर इंधनदरवाढीचे संकट ओढवले असून या सततच्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेसच्या वतीने उद्या, मंगळवारी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येणार आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी आणि जनतेची सुरु असलेली लूट थांबवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
इंधन दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर सोमवारी जोरदार टीका केली. सत्तेत आल्यास पेट्रोल, डिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा करणारे मागील १२ वर्षापासून सत्तेत असताना पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. मागील ११ दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवल्या आहेत. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.
इंधन दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारने ती तात्काळ मागे घ्यावी. महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी, अशी टीकाही त्यांनी केला. इराण युद्धाचे नाव पुढे करून केलेली दरवाढ ही दिशाभूल करणारी आहे. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारने पेट्रोलच्या किमती ३८ टक्क्यांनी तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यावेळी तर इराण -इस्त्राईलचे युद्ध नव्हते, याकडे सपकाळ यांनी; लक्ष वेधले आहे.
गेल्या चार -पाच दिवसात केलेल्या चार रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांनी काही तासांतच बाजारातून १२ हजार ४०० कोटींची कमाई केली. ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकून केलेली आहे. काँग्रेस सरकारच्या वेळी १-२ रुपयांनी पेट्रोल दरवाढ झाली की भाजपचे नेते रस्त्यावर उतरत होते. मग आता महागाईवर गप्प का, असा सवाल सपकाळ यांनी केला आहे.
