scorecardresearch

“तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

सोनिया गांधी यांना ईडीकडून सातत्याने चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याने देशभरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

nana patole (4)

नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीकडून सातत्याने चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याने देशभरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना नजीकच्या अँटॉप हिल पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात “तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” अशी घोषणाबाजी केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीमार्फत वारंवार चौकशीला बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या सूडाच्या राजकारणाविरोधात भरणी नाका, सायन कोळीवाडा येथे हे आंदोलन करण्यात आलं.

महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी काँग्रेसकडून विरोध प्रदर्शन केलं जात आहे. त्यानुसार मुंबईत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा करत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे WWF चा सामना, मारामारी होते पण…” मनसे नेत्याची खोचक टीका

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. शब्दांचे बाण फेकून आणि केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करून महाराष्ट्राची सत्ता पाडली गेली. महाराष्ट्रात ईडीचे सरकार आले, आताही शब्दांचे बाण सोडून जनतेचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रातील महाशक्तीच्या आधारे राज्यात सरकार स्थापन केलं. महिनाभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा- मोदी, भाजपला सदबुद्धी दे भगवान…!; काँग्रेसचे अभिनव आंदोलन

दुसरीकडे, नागपुरातदेखील आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. हे आंदोलन ईडी कार्यालयासमोर करण्यात आलं. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-07-2022 at 17:13 IST

संबंधित बातम्या