केंद्र सरकारविरुद्ध जालन्यात काँग्रेसची निदर्शने

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी या वेळी गेल्या सात वर्षांत शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न वाढल्याचे सांगितले.

congress
सौजन्य- Indian Express

जालना : मागील सात वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशास दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवले असून सर्वसामान्यांचे जगणे कठीण केल्याचा आरोप करून जिल्हा काँग्रेसच्यावतीने येथील गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी या वेळी गेल्या सात वर्षांत शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न वाढल्याचे सांगितले. केंद्र सरकारची आर्थिक धोरणे, जीएसटी संदर्भातील निर्णयांमुळे व्यापारी तसेच लहान व्यापाऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार राजेश राठोड यांनी दिवसेंदिवस होणाऱ्या इंधनाच्या दरवाढीबद्दल केंद्र सरकारचा निषेध केला. वाढती महागाई आणि सहा महिन्यांपासून दिल्लीच्या जवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने देशातील करोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केला. प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रा. सत्संग मुंढे, दिनकर घेवन्दे आदींनी या वेळी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राम सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते.

जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी प्रास्ताविक करताना गेल्या सात वर्षांत केंद्राने अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या अनेक योजना अडवून ठेवल्याचा आरोप केला. केंद्र सरकार विरोधी पक्षांशी द्वेषभावनेतून वागत असून सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्यायला या सरकारकडे वेळ नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्य़ातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या वेळी हातात काळे झेंडे घेऊन मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress protests against central government ssh